बीड : मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता राज्य सरकारकडून मराठा समाजाच्या इतर मागण्यांवर तातडीने हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात ज्यांनी जीव गमावला अशांच्या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार असून ही प्रक्रिया १५ जून पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी बीड जिल्ह्यातील ज्या व्यक्तींनी मराठा आरक्षण आंदोलनात जीव गमावला होता, त्यांच्या वर्षांचे प्रस्ताव दोन दिवसात प्रमाणित करून देण्याचे आदेश एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना अनेकांनी या आंदोलनात जीव गमावला होता. त्यावेळी सरकारने आरक्षण आंदोलनात ज्यांचा जीव गेला अशांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता या वारसांना एसटी महामंडळात नोकरी देण्यात येणार आहे . हि सारी प्रक्रिया येत्या १५ दिवसात पूर्ण होणार आहे.
बीड जिल्ह्यात या आंदोलनात ज्यांचा मृत्यू झाला होता, त्यांच्या वारसांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी ३ जून पर्यंत प्रमाणित करून द्यावेत असे निर्देश आता एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिले आहेत.
यांचा झाला होता मृत्यू
अभिजीत देशमुख ( केज ), विष्णू काळे (परळी ग्रामीण ), शिवाजी काटे (पिंपळनेर ), कानिफ येवले (अमळनेर ),मछिंद्र शिंदे (पिंपळनेर ), दिगंबर कदम (पिंपळनेर ), निकिता बेदरे (गेवराई ), अण्णासाहेब काटे (गेवराई ), सरस्वती जाधव (वडवणी )