बीड : बीड जिल्ह्यात आता कोरोनाचे आकडे कमी होत असले तरी बीडच्या आयटीआयमध्ये स्वॅब घेताना पुरेशी काळजी घेतली नसून त्यातून पॉझिटिव्हज असलेल्या रुग्णांचे अहवाल 'फाल्स निगेटिव्ह ' येत असल्याचा खळबळजनक दावा एका कोरोनाग्रस्त व्यक्तीनेच केला आहे. सदर व्यक्तीने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी तक्रार केली आहे. यात तिचा कोरोनाचा अहवाल पुण्यात पॉझिटिव्ह , मात्र बीडमध्ये नेगेटिव्ह् आल्याचे म्हटले आहे.
बीड जिल्ह्यात मागच्या दोन महिन्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढला होता. बाधितांचे वाढलेले प्रमाण, त्यातून मोठ्याप्रमाणावर झालेल्या तपासण्या, यामुळे अहवाल यायला देखील विलंब लागायचा. विशेष म्हणजे तयाकाळात बाधित व्यक्ती अनेक ठिकाणी फिरलेली असायची.
आता तर स्वतःला कोरोनाच्या संसर्गातून जावे लागलेल्या एका व्यक्तीने बीडच्या आयटीआयमधील स्वॅब घेण्याच्या पद्धतीवरच आक्सहॅप नोंदविला आहे. सदर व्यक्ती पुणे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून त्या व्यक्तीने पुण्यात कोरोनाची तपासणी केली.
मात्र तो अहवाल येण्यापूर्वी सदर व्यक्ती बीडला आली. तिने बीडच्या आयटीआयमध्ये तपासणी केली, या ठिकाणी तिचा अहवाल निगेटिव्ह आला, तर त्याचवेळी पुण्यात मात्र पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आता सदर व्यक्तीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून स्वॅब घेण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अहवाल 'फाल्स निगेटिव्ह ' येत असल्याचा दावा केला आहे.