Advertisement

कोरोनाने अनेकांची 'लाईफलाईन ' तुटत असतानाही डॉक्टर साजरा करतायत 'टार्गेट'पूर्तीचा आनंद

प्रजापत्र | Friday, 21/05/2021
बातमी शेअर करा

बीड :कोरोनाच्या महामारीत कोण कशाचा उपयोग करून घेईल आणि कष्ट आनंद शोधेल हे काहीच सांगता येत नाही. जिल्ह्यातील सामान्य नागरिक आणि प्रशासन कोरोनाचे आकडे कमी का होत नाहीत म्हणून अस्वस्थ असतानाच बीडमधील एका खाजगी डॉक्टरने मात्र आपल्या रुग्णालयात २०० पेशन्टचे 'टार्गेट ' पूर्ण झाल्यामुळे 'संतोष ' व्यक्त करणारा मेसेज डॉक्टर मंडळींना पाठविला आहे. लोक महामारीने अस्वस्थ आहेत, ज्यांची 'लाईफलाईन ' कायमची संपली त्यांचे कुटुंबीय दुःख पचविता  येत नाही म्हणून रडत आहेत, आणि अशावेळी काही खाजगी डॉक्टर रुग्णांच्या 'टार्गेट 'ची भाषा बोलत असल्याने संताप व्यक्त होत आहे. 

 

बीडमध्ये कोरोनाशी सामना करण्यासाठी सरकारी आणि खाजगीमधील आरोग्य यंत्रणा जीवाचे रान करीत आहे. मात्र काहींना या आपत्तीत देखील संधी सापडली आहे. खाजगी डॉक्टरांनी उपचारासाठी समोर यावे असे म्हटल्यानंतर मागच्या काही काळात ज्यांच्याकडे कायमस्वरूपी फिजिशियन नाहीत त्यांनी देखील 'ऑन कॉल' च्या भरवशावर कोविड हॉस्पिटल सुरु केले. अर्थात रुग्णांची वाढणारी संख्या पाहता सामान्यांची 'लाईफलाईन ' टिकावी म्हणून अशा कितीही दवाखान्यांची आवश्यकता अजूनही आहेच.

 

मात्र आता काही डॉक्टर चक्क रुग्णालयात येणाऱ्या पेशंटकडे 'टार्गेट ' म्हणून पाहत आहेत. दोन दिवसापूर्वी बीडमधील एका खाजगी डॉक्टरने ' आपल्या रुग्णालयात २०० रुग्णांचे टार्गेट पूर्ण झाले ' असा मेसेज अनेकांना पाठविला असून त्याच्या या 'टार्गेट पूर्तीत ' मदत केल्याबद्दल लोकांचे आभार देखील मानले आहेत. एकीकडे सारा जिल्हा रुग्णसंख्या कमी व्हावी म्हणून जातात असताना खाजगी डॉक्टर जर या रुग्णाकडे 'टार्गेट ' म्हणून पाहण्यात 'संतोष '  मानणार  असतील तर या कोरोनाने ज्यांची 'लाईफलाईन ' संपली त्यांच्या आणि माणुसकीच्यादृष्टीने मात्र हा प्रकार डागण्या देणारा आहे . 

Advertisement

Advertisement