Advertisement

जावई आणि कुटुंबाकडून अपमान झाल्याने सासूची आत्महत्या

प्रजापत्र | Sunday, 16/05/2021
बातमी शेअर करा

परळी-शहरातील विद्यानगर भागातील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तीन आठवड्यापूर्वी उघडकीस आली होती. जावई आणि त्याच्या कुटुंबियांकडून झालेला अपमान जिव्हारी लागल्यानेच आईने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीने केल्याने प्रकरणी डॉक्टर जावयासह चौघांवर शनिवारी (दि.१५) परळी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
   

         पोलिसांच्या माहितीनुसार, नमिता अमोल रकटे (२९, रा.पिंपळे सौदागर, पुणे, हमु विद्यानगर, परळी) हिने फिर्याद दिली. त्यानुसार, नमितीचा विवाह डॉ.अमोल रकटेशी झाला होता. मात्र, लग्नात नमिता व माहेरच्या लोकांना सासरच्या मंडळींनी खोटी माहिती देऊन दिशाभूल केली. लग्नानंतर नमिताची आई सुशीला विश्वनाथअप्पा बेंबळगे (६०,रा.विद्यानगर, परळी) यांचा सतत अपमान केला. 'तुम्ही लग्नात दिलेले स्त्रीधन तळतळाट करुन दिल्याने आमच्या घरावर दैवी कोप झाला आहे, त्यामुळे पुन्हा दोन लाख व एक सोन्याची अंगठी द्या' अशी मागणी केली गेली. शिवाय सुशीला यांच्यासह त्यांचे पती व मुलगा यांना जावई डॉ. अमोल याच्या पाया पडण्यास भाग पाडले. शिवाय चारित्र्याबद्दल संशय घेऊन सतत अपमानित केले. त्यामुळे सुशीला बेंबळगे यांनी २० एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. नमिता रकटे हिच्या फिर्यादीवरुन शनिवारी पती डॉ.अमोल शरणआप्पा रकटे, सासू जयश्री शरणआप्पा रकटे, सासरा शरणआप्पा विश्वनाथआप्पा रकटे, नणंद श्रूती शरणआप्पा रकटे यांच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला.तपास सहायक निरीक्षक जी.बी.पालवे करत आहेत.

Advertisement

Advertisement