Advertisement

बीड जिल्ह्यात नवीन लसीकरणाला ब्रेक

प्रजापत्र | Wednesday, 12/05/2021
बातमी शेअर करा

बीड : राज्यात कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आता बीड जिल्ह्यातील लसीकरण देखील बाधित झाले आहे. राज्य सरकारने मंगळवारी ४५ वयापेक्षा कामाचे लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर आता बीड जिल्ह्यात सर्वच वयोगटातील लसीकरण तात्पुरते स्थगित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी . पवार यांनी दिली. आता पुढील काळात जिल्ह्यात फक्त दुसऱ्या डोस साठी लस मिळणार आहे.

राज्यात कोरोना लसीकरण वेगाने सुरु करण्यात आले असले तरी आता राज्याला लसीचा तुटवडा जाणवत आहे. राज्यालाच लस मिळत नसल्याने जिल्हा स्तरावर लस पुरविणे अवघड झाले असून पुढील काळात लस पुरवठा आणखी बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील नवीन लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . बीड जिल्ह्यात लसीकरणासाठी १०० पेक्षा अधिक केंद्रे सुरु करण्यात आली होती. तसेच १ मे नंतर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी ऑनलाईन नोंदणी करून लसीकरण सुरु करण्यात आले होते . मात्र आता १८-४४ वयोगटाच्या लसीकरणासाठीचे स्लॉट बंद करण्यात आले आहेत. तसेच ४४ वर्षाच्या पुढील नागरिकांना देखील आता लस मिळणार नसल्याचे चित्र आहे.

केवळ ज्या आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर आणि ४५ वयापेक्षा अधिकच्या व्यक्तींनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांनाच आता दुसऱ्या डोसची लस दिली जाणार आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे आकडे अधिकच वाढत आहेत. ग्रामीण भागात कोरोना मोठ्याप्रमाणावर पोहचला आहे. अनेक गावे कोरोनाचे हॉटस्पॉट होत आहेत , अशावेळी जिल्ह्यात कोरोना लसीकरण स्थगित होत असल्याने कोरोना नियंत्रणात हा मोठा धक्का असणार आहे.

..............................................................................................................................................................................................................................

व्हिडिओ  देखील बघा  

कोरोना लाटेसंदर्भात  काय म्हणताहेत डॉ. सुभाष जोशी 

 

Advertisement

Advertisement