अशोक शिंदे
नेकनूर- दि.१२. सध्याच्या काळात परिचारिका असा शब्द उच्चारल्याबरोबर रुग्णांची अहोरात्र मेहनत करून सेवा करणारी, रुग्णांना धीर देणारी व त्यांचे मनोबल उंचावणारी, रुग्णाच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनून आरोग्याची काळजी घेणारी स्त्री आपल्यासमोर उभी राहाते. या कोरोनाकाळात तर परिचारिका रुग्णांची सेवा करण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाला दुर्लक्षित करून सेवा देत आहेत. त्यामुळे परिचारिका करीत असलेली मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरली असल्याने आजच्या परिचारिका दिनानिमित्त त्यांचं कौतुक केले जात आहे.
सध्याचा काळ हा आरोग्य सेवेतील महत्त्वाचा काळ मानला जात आहे. या काळात सेवा देताना परिचारिका दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आलेखही खाली येत आहे. त्यात आता रुग्णसंख्या कमी होताना परिचारिकांनी दिलेली सेवा मोलाची ठरत आहे. त्यात कोरोना रुग्णांसोबतच नियमित रुग्णांची काळजी घेत आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनी सौजन्याने वागण्याची माफक अपेक्षा परिचारिकांची असते. परिचारिका लसीकरण मोहिमेतही संपूर्ण ताकदीने सेवा देत आहेत. त्यामुळे कोरोना असो वा इतर कोणताही आजार परिचारिका कुठेही कमी पडताना दिसत नाहीत. त्यांच्यासाठी असलेल्या या गौरवदिनी सर्वांनी परिचारिकांचा गौरव करावा, अशी परिस्थिती आहे. रुग्णांच्या सेवेत खूप मोठे समाधान आहे. मानवाची सेवा हीच खरी ईश्वरसेवा समजून सर्वच परिचारिका भगिनी काम करतात. सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून कर्तव्य भावनेने हे कार्य करत आलो आहोत. रुग्ण बरे होऊन घरी जाताना त्यांचा चेहऱ्यावरील हास्य हेच प्रत्येक परिचारिकेच्या सेवेचे फळ असल्याचे मत या वेळी परिचारिका यांनी दिले आहे.