बीड दि.7 (प्रतिनिधी):-बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून लॉकडाऊन कडक करण्यात आला होता. यात किराणा दुकानांदेखील परवानगी नव्हती आता हा लॉकडाऊन आणखी पाच दिवसांसाठी कडक करण्यात आला असून बुधवारपर्यंत जिल्ह्यातील किराणा दुकाने व इतर आस्थापणा उघडता येणार नाहीत. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी हे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात मागच्या तीन दिवसांपासून लॉकडाऊनचे नियम अधिक कडक करण्यात आले असून वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत आस्थापणा आणि पेट्रोलपंप वगळता इतर सर्व व्यवहार पुर्णवेळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुर्वीच्या आदेशात शनिवार, रविवार हे दोन दिवस किराणा दुकान उघडता येणार होत्या. आता मात्र प्रशासनाने जिल्ह्यातील लॉकडाऊन आणकी कडक केला असून बुधवार दि.12 मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आस्थापणा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधीत दवाखाने, मेडिकल, त्याची वाहतूक वगळता इतर सर्व दुकाने अगदी किराणा, चिकण मटणची दुकाने, बेकरी या सुद्धा बुधवारपर्यंत पुर्णत: बंद राहणार आहेत. विशेष म्हणजे कृषीशी संबंधीत दुकाने देखील या पाच दिवसात बंद राहणार आहेत. या काळात सकाळी 7 ते 10 या वेळेत भाजीपाला विक्रेत्यांना व दुध विक्रेत्यांना हातगाड्यावर किंवा पायी जावून भाजी पाला, दुध विक्री करता येणार आहे. बँकेत केवळ शासकीय कामकाजासाठी 10 ते 12 याच वेळेत उघड्या राहतील. तसेच केवळ कोरोना कामासाठी नियूक्त शासकीय अधिकारी कर्मचार्यांनाच रस्त्यावर फिरण्याची मुभा असेल. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता बुधवारपर्यंत जिल्हा कडेकोट बंद राहणार आहे.
बातमी शेअर करा