बीड-तलाठ्यांना पैसे कसे खावे याची बैठकीतच शिकवणी दिल्याचा आरोप असलेल्या अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव यांची चौकशी तातडीने होणार नाही, त्यामुळे चौकशी सुरु असेपर्यंत त्यांची इतरत्र बदली करावी अशी शिफारस बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
अंबाजोगाईच्या उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव यांच्याविरोधात तलाठ्यांनी तक्रार दिली आहे. जाधव यांनी तलाठ्यांच्या बैठकीत तलाठ्यांना पैसे कसे खावे याची शिकवणी दिल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच शोभादेवी जाधव यांचे संभाषण असल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप देखील तक्रारीसोबत देण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश मंगळवारी आयुक्तांनी दिले होते. त्यावर आता बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाच्या चौकशीत उत्तर देण्यासाठी जाधव यांनीं वेळ मागितला असून 'त्या' ऑडिओ क्लिपची देखील पडताळणी करावी लागेल असे सांगत सध्या उपविभागीय अधिकारी शोभा देवी जाधव यांची इतरत्र बदली करावी अशी शिफारस आयुक्तांकडे केली आहे.
प्रजापत्र | Wednesday, 05/08/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा