हेल्मेट सक्तीच्या नावाखाली दादागिरी
बीड : बीड जिल्ह्यात कोरोनाच्या नियंत्रणासाठी लावलेल्या निर्बंधाच्या नावाखाली पोलीसांची दादागिरी सुरु असल्याचे चित्र बीडमध्ये पहायला मिळत आहे. रस्त्यावर का आले म्हणून कुठलीही खातरजमा न करता आरोग्य अधिकारी, कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती यांना देखील पोलीसांकडून मारहाण होत असल्याचे चित्र बुधवारी पहायला मिळाले. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या पथकाने आष्टी तालुक्यातील एका वैद्यकीय अधिकार्यालाही मारहाण केल्याचे समोर आले आहे.
बीड जिल्ह्यात सध्या लॉकडाऊनचे निर्बंध कठोर करण्यात आले आहे. मात्र या कठोर निर्बंधांच्याआड आता पोलीसांकडून सामान्यांसोबतच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचार्यांनादेखील मारहाण केली जात असल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी माळीवेस परिसरात एका मेडिकल चालकाला आणि खाजगी दवाखान्यातील कर्मचार्याला उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या पथकाने मारहाण केली होती. त्यानंतर सायंकाळी चर्हाटा फाट्याजवळ टाकळसिंग येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल वनवे यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. मागच्या दोन तीन दिवसात बीड शहरात खाजगी दवाखान्यातील कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी यांना अडविणे, उर्मट बोलणे, धक्काबुक्की असे प्रकार होत होते. आता थेट डॉक्टरांनाही मारहाण होऊ लागल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पोलीसांच्या मारहानीच्या निषेधार्थ काम बंद आंदोलनाची भूमिका घेण्याच्या मानसीकतेत आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आहेत.
या सोबतच हेल्मेट सक्तीच्या नावाखाली देखील पोलीसांकडून अनेकांना मारहाण आणि दंड अकारणी होत असल्याचे चित्र आहे. उच्च न्यायालयाचे आदेश आम्ही राबवत आहोत असे पोलीस सांगत असले तरी 80 % पोलीस कर्मचारी मात्र बिना हेल्मेटचे फिरत आहेत. औरंगाबाद सारख्या जिल्ह्यात लॉकडाऊन संपेपर्यंत हेल्मेट सक्तीतून सवलत देण्यात आली आहे. मात्र बीडमध्ये पोलीसांकडून सक्ती सुरु असल्याबद्दलही संतापाचे वातावरण आहे.