समीर लव्हारे
बीड-मागील ६६ दिवसांनंतर देशात इंधनाची दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोल २४ पैसे तर डिझेल २९ पैसे प्रति लिटर महागले असून विशेष म्हणजे पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर ही दरवाढ करण्यात आली. बीडमध्ये सध्या पेट्रोल ९८.१८ रुपयांच्या घरात असून डिझेल ८७.८५ रुपयांवर पोहचले आहे.दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी १०० ओलांडलेल्या पेट्रोलचे काही दिवसांपूर्वी दर घसरले होते मात्र आता निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर इंधनाचे दर वाढू लागल्याचे चित्र आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज जाहीर केले जातात. मधल्या काळात सातत्याने दरवाढ होत असल्याने आंदोलने झाली होती. मात्र, नंतर पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. तेव्हापासून म्हणजे २७ फेब्रुवारीपासून इंधनाचे दर स्थिर होते. एवढेच नव्हे तर मार्चमध्ये काही वेळा कपातही झाली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या खनिज तेलाचे दर वाढल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना इंधन दरवाढ करणे अपेक्षित होते, तरीही ती टाळण्यात आली होती. त्यामुळे निवडणुकांमुळे दरवाढ केली जात नसल्याची चर्चा सुरू होती. २ मे रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर मंगळवारी (दि.४) सकाळी इंधनाची दरवाढ करण्यात आली. तब्बल ६६ दिवसांनी दरवाढ झाल्याने आता अनेक जिल्ह्यात पेट्रोल शतक करणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.मागील अनेक दिवसापासून पेट्रोल ९७.९४ तर डिझेल ८७.५६ रुपये होते.मात्र आता पेट्रोल ९८.१८ तर डिझेल ८७.८५ रुपयांवर पोहचल्याने वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रजापत्र | Tuesday, 04/05/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा