हेल्मेट सक्तीवरून सामन्यांमध्ये संताप
बीड-मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्देशानंतर सोमवारी पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात हेल्मेटसक्ती सुरु केली आहे. अनेकांना हेल्मेट नसल्याने ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र या हेल्मेट सक्तीवरून आता सामान्य नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. 'इथे सारे काही बंद असल्याने रोजच्या जगण्याचे वांदे आहेत, घरातील जवळचे लोक जगण्या मारण्याशी संघर्ष करीत आहेत,अशावेळी पोलीस हेल्मेटसक्ती करीत आहेत. एकतर सारे बंद आहे, अशावेळी हेल्मेट आणायचे कोठून ? वेळ कोणती आणि प्रशासन कशावर शक्ती खर्च करीत आहे? ' असे अनेक प्रश्न सामान्यांमधून व्यक्त होत आहेत .
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागील आठवड्यात एका जनहित यांच्यात निर्देश देताना अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना रस्त्यावर यायचे असेल तर त्यांना हेल्मेट सक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्देशांची सोमवारी जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु झाली . सोमवारी सकाळपासून पोलीस ठिकठिकाणी वाहनधारकांना हेल्मेटबाबत विचारणा करत होते. अनेकांना हेल्मेट नसल्याने दंड देखील करण्यात आला. तर काही ठिकाणी पोलिसांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे आता सामान्य जनतेत संतापाची भावना आहे.
'सध्या कोरोनामुळे प्रत्येकजण हताश झाला आहे. रस्तावर येणार व्यक्ती एक तर अत्यावश्यक सेवेत सेवा देणारा आहे, किंवा ज्यांचे कोणी तरी रुग्ण आहेत, त्याच्या औषध, उपचार , जेवण याची व्यवस्था करणारा आहे. काही जण लसीकरणासाठी निघत आहेत. यातील कोणाकडेच हेल्मेट नाही. आजच्या परिस्थितीत सर्व जण आपापल्या अडचणीत आहेत. अनेकांना रोजचे जगणे अवघड झाले आहे. सारे काही बंद असल्याने पैसे नाहीत, बरे हेल्मेट विकत घ्यायचे म्हणले तरी दुकाने बंद आहेत . मग अशावेळी हेल्मेट आणायचे कोठून आणि हे वेळ हेल्मेट सक्तीवर जोर लावण्याची आहे का ? ' असा सवाल लोक करीत आहेत.
आरोग्य कर्मचारी देखील अस्वस्थ
सोमवारी हेल्मेट सक्तीच्या मोहिमेचा फटका आरोग्य कर्मचाऱ्यांना बसला . अनेकांना दंड करण्यात आला तर काहींना पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली. ओळखपत्र दाखविल्यानंतरही गाडीवर काठ्या मारणे, चावी काढून घेणे असे प्रकार घडल्याचे आरोग्य कर्मचारी बोलत आहेत. आम्ही २४ तास अत्यावश्यक सेवा देतोय आणि हेल्मेटच्या नावाखाली आमचा छळ कशासाठी असा सवाल हे कर्मचारी विचारीत आहेत.
सुवर्णमध्य काढू : जिल्हाधिकारी जगताप
यासंदर्भात बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हेल्मेट सक्तीचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत, मात्र अनेकांकडे हेल्मेट नाही, कोणी आजारी असेल त्या परिस्थितीत अनेकांची माणिकता वेगळी असते हे वास्तव आम्हाला मान्य आहे, यातून लवकरच सुवर्णमध्य काढू असे सांगितले