Advertisement

 सिटीस्कॅन केंद्र देताहेत कोरोना  संसर्गाला निमंत्रण     

प्रजापत्र | Monday, 03/05/2021
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यातील सिटीस्कॅन केंद्रांवर सध्या सर्वाधिक गर्दी आहे. या ठिकाणी शारीरिक अंतराचे नियम देखील पाळले जात नसल्याने ही केंद्रच संसर्गाला निमंत्रण देणारी ठरत असल्याचे चित्र आहे.
कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असतानाच सध्या कोरोनाचे निदान करण्यासाठी सर्रास सिटीस्कॅन रेपोर्टला आधार मानले जात आहे. रुग्णाच्या आरटीपीसीआर किंवा अँटीजेन चाचणीचा अहवाल येण्यापूर्वी देखील डॉक्टर रुग्णाला सिटीस्कॅन करण्याचा सल्ला देतात, त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्वच सिटीस्कॅन केंद्रांवर मोठी गर्दी दिसत आहे. यातील काही सिटीस्कॅन केंद्र नागरी वस्तीत आहेत. तर बहुतांश सिटीस्कॅन केंद्रांमध्ये रुग्णांना बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे हे केंद्रे सध्या गर्दीने खच्चून भरलेली दिसत आहेत. या ठिकाणी रुग्णांना बसण्याची देखील पुरेशी व्यवस्था नाही, त्यामुळे अगदी कचरा कुंडीच्या बाजूला काही रुग्ण बसलेले असतात. या ठिकाणी कोरोनाबाधित आणि संशयित सारेच रुग्ण येत आहेत, बाधित आणि संशयित रुग्णांना वेगळे ठेवण्याची व्यवस्था कोणत्याच केंद्राने केलेली नाही , परिणामी अनेकांना येथूनच संसर्ग होत असल्याची परिस्थिती आहे . या ठिकाणी शारीरिक अंतराचे  नियम पळाले जाण्यासारखी परिस्थिती नसल्याने धोका वाढत आहे. मात्र सध्या अडचणीच्या काळात सारेच केवळ 'कमाई 'कडेच पाहत असल्याने संसर्गाच्या धोक्याकडे कोणीच लक्ष देत नाही .
  

 

सारे काही टेक्निशियनवर
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सिटीस्कॅन केंद्रांचे पेव फुटले आहेत. कोरोना साथ वाढू लागल्यांनंतर अनेक नवीन केंद्रे सुरु झाली. जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टीने ही चांगली बाब असली तरी बहुतांश केंद्रांचा कारभार टेक्निशियनच हाकत आहेत. रेडिओलॉजिस्ट दूर कुठेतरी बसून, अनेक किलोमीटरवरून इमेलवर किंवा वॉट्सअप वर फिल्म पाहून अहवाल पाठविण्याचे काम करतात , त्यामुळे देखील अहवालाच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह कायम आहे. अनेक प्रकरणात अहवाल कॉपीपेस्ट केले जात असल्याची भीती देखील व्यक्त होत आहे.

 

 

बोगस अहवालाच्या चौकशीसाठी समिती
बीडमध्ये एकाच रुग्णाचे खाजगी आणि सर्कारीमधील सिटीस्कॅन अहवाल वेगवेगळे आल्याचे समोर आले होते. वंचित बहुजन आघाडीने ही बाब समोर आणली होती.या प्रकारची चौकशी करण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्सीय समिती गठीत केली आहे. अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील रेडिओलॉजिस्ट डॉ. तरवेश पाटील यांच्यासह बीडच्या जिल्हा रुग्णालयातील डॉ. आय व्ही शिंदे आणि डॉ. आर. बी . देशपांडे यांचा या समितीत समावेश आहे.

Advertisement

Advertisement