बीड : मागील ३ दिवसांपासून जिल्ह्याला रेमडीसेविर इंजेक्शनची प्रतीक्षा आहे. प्रशासनाकडून केंद्रीय पद्धतीने जे वाटप होते ते देखील शनिवार नंतर झालेले नाही, या पार्श्वभूमीवर आता सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी सकाळी जिल्भ्यत १ हजार इंजेक्शन मिळतील अशी माहिती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.
'आपण जिल्ह्याला रेमडीसेविर चा पुरवठा नियमित व्हावा यासाठी वेगवेगळ्या यंत्रणांशी संपर्क ठेवून आहोत. जिल्ह्याला सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळ पर्यंत १ हजार रेमडीसेविर इंजेक्शन लातूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत मिळतील . यातील ५०० इंजेक्शन अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाला आणि ५०० जिल्हा रुग्णालयाला मिळणार आहेत ' अशी माहिती माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील रेमडीसेविरचा तुटवडा काहीसा कमी होईल, किमान सरकारी रुग्णालयातील रुग्णांना तरी इंजेक्शन मिळतील असे अपेक्षित आहे.
दरम्यान जिल्हा प्रशासनाने शनिवारी सुमारे २१५ इंजेक्शन वाटप केले होते, त्यानंतर अद्याप एकही इंजेक्शन वितरित झालेले नाही. तर ५०० हुन अधिकची प्रतीक्षा यादी प्रशासनाकडे तयार आहे.