मैत्री.... या नात्यला निश्चित अशीच कोणती चौकट नसते. मैत्री कोणामध्ये व्हावी यालाही काही बंधन नसतं. मैत्री कोणत्या हद्दीपर्यंत जाते याचा निश्चित असा काही ठोकताळा नाही. बरं ही ठरवूनही करता येत नाही. मैत्री कधी होते हे कळत नाही पण मित्र ही सगळ्यात मोठी शक्ती असते. मैत्री म्हणजे नेहमीच सोबत फिरणं असंही नाही. पण ते असंत एक संरक्षक कवच. अनेकदा न दिसणारं पण कायम सुरक्षा पुरविणारं. हे नातं रक्ताचं नसतंच अनेकदा पण रक्ताच्या नात्यापेक्षाही एक वेगळा घट्टपणा या नात्यात असतो. हसर्या चेहर्या मागचंही दु:ख ओळखण्याची क्षमता या नात्यात असते आणि अडचणीच्या काळातही कसं हसवायचं हे मित्राला चांगलं माहित असतं. ही मैत्री टिकते कशी, बहरते कशी? सर्वांनाच मैत्रीच्या या रोपट्याचा वटवृक्ष करणं जमतं का? ज्यांच्या मैत्रीनं वटवृक्षाचं रूप घेतलयं त्यांची मुळं कोणत्या पोशकद्रव्यांवर पोसली गेलीत हे उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. ही जी मैत्रीची उदारहणं आज या ठिकाणी दिलीत ती खरं तर प्रतिकात्मक आहेत. पण यातून निखळ मैत्री कशी रूजते, कशी वाढते हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे.
‘संतोष’दायक मैत्रितला ‘वसंत’
एकजण अबोल म्हणावा असा ज्याचं बोलणं विकत घ्यावं लागतं असं म्हटलं तरी हरकत नाही. तर दुसरा प्रचंड बोलका. कोणत्याही विषयावर किती बोलू आणि किती नको असं वाटणारा. एकजण कायम पडद्यामागे राहणारा तर दुसरा पुढे येऊन नेतृत्व करणारा. एकाच्या मनाचा थांग कोणालाच लागणार नाही तर दुसर्याच्या बोलण्यातून त्याच्या मनापर्यंत सहज डोकावता येईल अशी परिस्थिती. पण या दोघांमध्येही एक साम्य. नवं काही करायचं म्हटलं की ही जोडी अगदी तयारच असते. मग एखादा नवा उपक्रम असेल, एखादी नवी संघटना असेल किंवा आणखी काही. त्या ठिकाणी मात्र या दोघांच्या स्वभावातलं वेगळंपण चुकूनही दिसून येत नाही. एखाद्या ठिकाणी यापैकी एखादा व्यक्ती असेल तर दुसरा असणारच असं जणू समिकरण बनलेलं आणि ते देखील एकदोन वर्षांचं नाही तब्बल दोन दषकांपासून हे चित्र बीडकर पाहतायत. बीडच्या पत्रकारीतेतली ही जोडी म्हणजे संतोष मानूरकर आणि वसंत मुंडे.अगदी अनेकदा संतोष मुंडे, वसंत मानूरकर असं सहज म्हणून जावं इतकं त्यांच्यातलं एकजीवपण बीडमध्ये पहायला मिळतं.
खरंतर मैत्री जुळणं आणि टिकणं तितकं सोपं नसतं. संतोष मानूरकरांच्या शब्दात सांगायचं तर ही मैत्री म्हणजे काहीतरी पूर्वसंचित असावं. त्याशिवाय ती जुळत आणि टिकत नाही. पण एकदा मैत्री जुळल्यानंतर 20 वर्ष ती टिकवणं खरंच सोपं नसतं. त्यातही एकाच क्षेत्रात काम करणारे दोघे असतील आणि सामाजिक उंचीमध्येही दोघे तोलामोलाचे असतील तर मैत्रीचा हा प्रवास अधिकच कठीण असतो. पण या जोडीनं तब्बल दोन दशकं हा प्रवास हातात हात घालून केलाय. आणि आता ही मैत्री ज्याला ‘ब्रँड’ मैत्री असं म्हणता येईल अशा पातळीवर गेलीय. त्यामुळं ही मैत्री टिकवणं ही दोघांचीही गोड जबाबदारी झाल्याचं या दोघांनाही वाटतं.
एकाच क्षेत्रात काम करताना मैत्री टिकते कशी याचं रहस्यही वेगळंच आहे. या दोघांच्या मैत्रीत एक गोष्ट दोघांनीही पाळली ती म्हणजे एकानं दुसर्याच्या आयुष्यात फार डोकवायचं नाही. मैत्री आहे म्हणून दुसर्याच्या आयुष्यात हस्तक्षेपही करायचा नाही. ज्याला त्याला स्वत:चा स्पेस द्यायचा. एकमेकाला एकमेकाच्या प्रगतीत मदत करायची पण दुसर्याच्या प्रगतीत आपण अडथळा व्हायचं नाही. आणि मैत्रीत कोणी कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या नाहीत. एकदा अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर मग व्यवहाराच्या तराजूत ती मैत्री मोजण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि मग ती मैत्री वाढत जाते. या मैत्रती दोघांनी रोजच भेटलंच पाहिले असंही नाही. हे दोघे रोज एकमेकाला बोलतातच असेही नाही. पण भेटी नसल्या तरी आत्मीक संवाद कायम असतो आणि आपल्या कोणत्याही निर्णयात आपला मित्र सोबत असेल हा विश्वासही असतो त्याच विश्वासावर मागच्या 20 वर्षात बीडच्या पत्रकारीतेत, पत्रकारसंघाच्या राजकारणात आणि राजकारणांच्या सल्लागार मंडळात ही जोडी खर्या अर्थाने ‘दो दिल एक जान’ म्हणूनच वागत आली आहे. यांच्यात मतभेद होत नाहीत असं नाही. पण मतभेदाचा प्रसंग आलाच तर ऐकानं तात्काळ माघार घ्यायची हा अलिखित नियम. आणि पुढच्या आघाडीवर कोणी जायचं आणि पडद्यामागून पूरक भूमिका कोणी घ्यायची ही ठरलेलं. म्हणूनच माध्यमांसारख्या क्षेत्रात तब्बल 20 वर्षापासून मैत्रीची एक वेगळी ओळख देत टिकली आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------
अव्यक्त मैत्री
या दोघांना एकत्रित फिरताना फार कोणी पाहिलेलं नसेल. कुठं, कोणत्या कार्यक्रमात हे नेहमीच सोबत असतात असंही नाही. दोघांच्या राजकीय भूमिका अनेकदा वेगळ्या, दोघांचं कार्यक्षेत्रही वेगळं. स्वभावातही मोठ्या प्रमाणावर म्हणता येतील असं वेगळंपण. एकजण धडक निर्णय घेणारा, पुढच्या धोक्यांचा विचार न करता एकदा मनाला वाटलं की तसा निर्णय घेणारा तर दुसरा ज्याला ‘थंडा करके खाओ’ म्हणतात त्या पठडीतला. शांतपणानं वेळ घेऊन निर्णय घेणारा पण ही स्वभावभिन्नता असली आणि दोघं एकमेकांना नेहमीच सोबत राहून भेटत नसले तरी एकाकडं गेलं की पहिला प्रश्न असणार ‘काय म्हणतायत आमचे मित्र?’ राजकारणातील या जोडीचं नाव आहे रमेश आडसकर आणि पापा मोदी. एकानं जिल्हापरिषदेच्या राजकारणावर आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं तर दुसर्याला नगर पालिकेच्या माध्यमातून आपला वेगळा ठसा उमटवलेला. शिक्षण, सहकार या क्षेत्रामध्ये दोघांचंही काम उल्लेखनीय.
तसं पाहिला गेलं तर राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि मेघराज आडसकर हे मित्र एकाच शाळेत शिकणारे. बाबूराव आडसकर उर्फ तात्या यांचं जितकं प्रेम स्वत:च्या मुलांवर तितकंच पापा मोदींवरही. मेघराज साहेबांचा छोटा भाऊ म्हणून रमेश आडसकरांशी शाळेत असताना झालेली ओळख आणि त्या ओळखीनंतर हळूहळू त्याचं मैत्रीत झालेलं रूपांतर. तसं पाहिला गेलं तर राजकीय वर्तुळात या दोघांना एकत्र पाहिल्याचं हे दोघं एकत्र फिरल्याचं फार कोणाला आठवत नसेल. पण ज्यांना बीडच्या राजकारणाची माहिती आहे त्यांना हे पक्कं माहित असतं पण आडसकरांच्या प्रत्येक निर्णयात मोदी असतात आणि मोदींच्या राजकीय वाटचालीत आडसकरांच्या शब्दाला वेगळंच महत्व आहे. रमेश आडसकरांकडे भेटायला गेलं की ते विचारणारच. ‘काय म्हणतात पापा शेट?’ आणि पापा मोदींकडं गेलं की‘रमेश रावचं काय चाललंय?’ हा प्रश्न ठरलेला. खरंतर या दोघांचं ही काय चाललयं हे त्या दोघांपेक्षा माहित शक्य नसतं. पण तरीही दोघांचं एकमेकांबद्दल व्यक्त होणारं हे प्रेम मैत्रीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातं.
तात्या आणि तात्यांनी जोडलेली माणसं हा दोघांमधलाही समान धागा. म्हणूनच अंबाजोगाई पापा मोदींना कुमक करण्याचं काम न सांगता, न बोलताही रमेश आडकरांकडून होतं आणि रमेश आडसकरांंना साथ देण्यासाठी पापा मोदी कायम तयार असतात. खरं तर दोघांच्याही राजकीय विचारधारा अनेकदा वेगळ्या झाल्या. मतदार संघाच्या मर्यादंांमुळे असेल रमेश आडसकरांना वेगवेगळे राजकीय निर्णय घ्यावे लागले. राजकिशोर मोदींनाही पक्षांतर्गत गटबाजीतून कधी सवतासुभा दाखवावा लागला पण राजकीय भूमिका काहीही असल्या तरी त्याचा परिणाम रमेश आडसकर आणि पापा मोदी या मैत्रीवर झाला नाही. अगदी आडसकरांसाठी काही अडचणीचं असेल तर त्याच्या वेदना पापा मोदींच्या चेहर्यावर दिसतात आणि एखाद्या प्रसंगातून पापा मोदींना आनंद होणार असेल किंवा त्यांची प्रगती होणार असेल तर त्याचा आनंद रमेश आडसकरांच्या वागण्या बोलण्यातून दिसतो. राजकारणातील मैत्रीच्या अनेक जोड्या आहेत. गोपीनाथ मुंडे-विलासराव देशमुख, शरद पवार-श्रीनिवास पाटील अशी कितीतरी नावं यात जोडता येतील. त्याच धर्तीवर रमेश आडसकर आणि पापा मोदी यांची मैत्री तशी बाहेर चर्चेत नसणारी सार्वजनिक ठिकाणी व्यक्त न होणारी पण अव्यक्ताच्या भावनेतूनही टिकवून राहिलेली. तब्बल 3 दशकांचा प्रवास करणारी आहे.
------------------------------------------------------------
संघर्षाचा समान धागा
त्या दोघांच्या वयात तसं बरंच मोठं अंतर किमान दहा बारा वर्षांचं. एवढ्या अंतराला जनरेशन गॅपही म्हणता येईल पण या अंतराचा परिणाम त्यांच्या मैत्रीवर झाला नाही. दोघांची कामाची पध्दत वेगळी. एकाला राग आला तर सहन होणार नाही आणि दुसरा रागावला तरी हसतच भांडणार. पण या दोघांमध्ये एक समान धागा आहे तो धागा आहे संघर्षाचा. दोघांच्याही आयुष्यात मोठा संघर्ष आहे आणि त्या संघर्षानं त्या दोघांना उभं राहिला शिकवलं. कदाचित यामुळंच ते दोघं एकत्र आले असतील. सामाजिक क्षेत्रात काम करणारांना एवढ्या शब्दात ते व्यक्ती कोण आहेत ते सहज लक्षात येवू शकतं. एकाच्या कामाची सुरूवात रक्तदाराच्या अभियानातून झाली तर दुसरा मानवी हक्कासाठी धडपडत राहिला. धडपडणारा तत्वशील कांबळे आणि अशोक तांगडे यांची ही जोडी. सामाजिक कामात जिथे कुठे विषय निघतो तिथे अशोक तांगडेंचं नाव घेतलं की तत्त्वशील कांबळे असणारच हे जणू गृहीतच बनलेलं. इतकं या दोघांना एकत्र पाहिलं जातं. अशोक तांगडे असतील तर तिथे तत्वशील असणारचं. आणि दिसले नाही तर लोकांच्या भुवया लगेच उंचावणार. अगदी अशोक तांगडेंना काही बोलायचं आणि फोन लागणार नसेल तर तत्वशील कांबेळंंजवळ निरोप द्यावा किंवा एखाद्याला रक्ताची गरज आहे आणि तत्वशील कांबळेंचा संपर्क होत नसेल तर बिनधास्त अशोक तांगडेंच्या फोनवर संपर्क करावा हे एकजिन्सीपण.
त्या दोघांकडे पाहून त्यांच्या वयात दहाबारा वर्षाचं म्हणजे खर्या अर्थाने एका पिढीचं अंतर असेल असं वाटत नाही पण हे खरं आहे.वयाचा फरक असतानाही मैत्री टिकते कशी. या प्रश्नावर अशोक तांगडेंनी लिहिलेल उत्तर खरं तर सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल असं. ‘समोरच्याच्या वयात आपल्याला जाता आलं पाहिजे.’ ते आम्ही करतो. तत्वशील वयाने लहान असेल तरी माझी एखादी गोष्ट चुकीची वाटली तरी तो सल्लाही देतो. अशावेळी आपलं वय कमी का जास्त हा विषय महत्वाचा नसतो. यासोबतच या दोघांनीही मैत्रीचा परिघ वाढवताना काही मर्यादा स्वत:वरही घातल्यात आणि काही गोष्टी स्वत:च्या मनाला ठामपणे सांगितल्यातही. मैत्री आहे म्हणजे त्याच्या सगळ्या आयुष्यावर आपला हक्क आहे असं नाही. आपल्या मैत्री पलिकडे जाऊनसुध्दा एखाद्याला स्वत:च्या प्राधान्याचं वेगळं काम असू शकते हे मान्य करता आलं तर मग मैत्रीतले अनेक गैरसमज दूर होतात. या दोघांनी ते जपलं आहे. एकदा का हे मान्य केल की मग आपल्या प्रत्येक हाकेला असा अट्टाहास निर्माण होत नाही. मात्र हे करतानाही दोघांना एकमेकांची खरी गरज केंव्हा आहे हे दोघंांनाही चांगलं ठाऊक असतं. एखादी अत्याचाराची घटना घडली आणि अशोक तांगडेंनी फोन केला आणि ‘आपल्याला इथे निघायचं आहे’ असं सांगितलं की कुठे आणि का असा प्रश्न कधी तत्वशील कांबळेंनी विचारलेला नाही आणि ‘भाऊ आपल्याला अमुक ठिकाणी जायचं आहे’ या निरोपावर अशोक तांगडेंनी कशासाठी हा प्रश्न विचारला नाही. आपल्याला सोबत चलण्यासाठी फोन आला आहे म्हणजे खरोखर ते तितक्या निकडीचं आहे हा विश्वास दोघांमध्ये असतो. आणि म्हणूनच एकमेकांना पूरक काम करत मैत्री वाढत कधी जाते हे त्या दोघांनाही कळत नाही. यांच्या स्वभावात वेगळेपण नाही असं नाही. तत्वशील कांबळे या व्यक्तीला कधी रागच येणार नाही तर अशोक तांगडेंना राग आल्यावर तो सहन होणार नाही. तत्वशीलची गट्टी अधिकार्यांसोबत तर अशोक तांगडेंना कार्यकर्त्यात रमायला आवडतं. आणि म्हणूनच आपले वेगवेगळे स्वभाव हे त्यांनी एक दुसर्यांसाठी बलस्थान बनविली. हे सगळं करताना मतभेदाचे मुद्दे येत नाहीत असं नाही पण मैत्रीतही प्रत्येकाला स्वत:ची वेगळी भूमिका असते हे मान्य करून काम करायचं. एखाद्या विषयावर आपला सल्ला द्यायचा पण त्यानं आपल्याच भूमिकेवर आलं पाहिजे असा आग्रह करायचा नाही. एवढं पथ्य पाळून आज त्यांची मैत्री बहरत आहे
-----------------------------------------------------------------------------------------------
ऋणानुबंधाच्या मैत्रीय गाठी
समविचारी माणसं जवळ आली की त्यांची घट्ट मैत्री होते. आयुष्याला पुरून उरणारी. मी आणि शैला लोहिया विद्यापीठाच्या एका सेमिनार निमित्त एकवीस दिवस एकत्र राहिलो. समोरासमोरच्या खोलीतील आम्ही दोघी ओळख होताच एका खोलीत राहिलो. खूप गप्पा, खूप फिरणे, एकमेकींच्या स्वभावाची नि आवडीची नाळ जोडली गेली. मैत्रीणीची दिदी झाली नातं आणखीच रूजलं, विचार सारखे, महिलांच्या, युवकांच्या प्रश्नबद्दल विद्यार्थ्यांच्या कलागुणांविषयी देवाण घेवाण सुरू झाली. पुढे युवक महोत्सवातील दरवर्षी कुठे ना कुठे एकत्र येत राहिलो.
माझा पी.एच.डी.चा संशोधनाचा विषय तिला कुणीतरी सुचविला होता. पण बोलता बोलता मी त्याव काम करते आहे, हे ऐकून ती म्हणाली मला माहित नव्हते, मी दुसरा विषय निवडते. त्यानंतर तिने लोकसाहित्यावर संशोधन केले.
वैजापूर येथील महाविद्यालयात प्राचार्य रा.रं.बोराडे असताना आम्हा दोघींना एका कार्यक्रमासाठी बोलावले, तेव्हा दोन दिवस त्याच विषयाची चर्चा करत आम्ही दोन दिवस मजेत घालविले. आमच्या मैत्रीचा पैस अजूनच मोठा झाला.
अंबाजोगाईला कोणताही कार्यक्रम असो बोलावले की मी जात असे, तेव्हा तिच्याच घरी राहात असे. नि बीडला किंवा इतरत्र कुठे तीही येत असे.
महाराष्ट्र शासनाने महिला धोरण जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्रभर ‘निर्णय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग’ या विषयावर स्त्रीजागृती आणि समाजप्रबोधनासाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन दोन कार्यक्रम महिला संघटनांच्या वतीने घेतले गेले, तेव्हा मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये डॉ.नीलम गोर्हे सकट शैला लोहिया मी आणि त्या त्या जिल्ह्यातील दोन तीन महिला अशा दहा दिवस फिरून कार्यक्रम घेतले. शैलादिदीचा आवाज गोड होता त्यामुळे गाणी स्त्रीगीते प्रामुख्याने ती म्हणत असे.
आणीबाणीच्या काळात डॉ.लोहियांना मीसाखाली अटक झाल्यावर पूर्ण घरची जबाबदारी तिने पेलली. तेव्हा कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले, कसे कसे लोकांचे अनुभव आले यावर एकदा आमचे विस्ताराने बोलणे झाले. मन मोकळे झाले, आणि ती अधिक जवळची झाली.
निखळ मैत्रीमध्ये एक अतूट घट्ट भावबंध तयार होते. मग घरातील, बाहेरील बर्याच गोष्टींवर चर्चा होतात. तशा आमच्या होत असत.
तिचा आंतरजातीय विवाह. तिचा मुलगा प्राध्यापक झाल्यावर एकदा ती म्हणाली. मला मराठा सून चालेल. मग आम्ही दोघींनी मिळून काही मुली पाहिल्या, पण नकळतपणे पाहिल्या होत्या. अर्थात घरच्यांना हे माहित नव्हते. पुढे त्याची गरज पडली नाही. पुढच्या काळात जावई मराठा जोडला गेला.
ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्ससाठी ओरिसा येथील भुवनेश्वरला आम्ही पाचजणी मराठवाड्यातून गेलो होतो. तेव्हा आठ दिवस कोणार्कच्या सूर्यमंदिर, जगन्नाथपुरी चिल्का सरोवर, पूर्वेकडील समुद्र किनारा ही एकत्रच पालथा घातला.
ओरिसामध्ये प्रत्येक शेतात छोटी छोटी शेततळी असतात, त्यात कमळे लावतात. कालिदासाच्या काव्यात त्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख येतो ते आठवले. इतक्या लांबून आम्ही एका शेतकर्याकडून कमळाचे आठदहा गड्डे घेऊन आलो. आजही ती कमळे अंबाजोगाईला जुनाच्या(दिदीच्या लेकीच्या) घरासमोरील हौदात मस्त डुलताहेत. आम्ही जेथे जात असू तेथून कोणते तरी एखादे फुलाचे रोप आठवण म्हणून आणत असू. तिच्या आणि माझ्या बागेत अशी अनेक रोपे आजही फुलताहेत.
1995 ला चीन देशामधील बिजींग येथे झालेल्या जागतिक महिला परिषदेसाठी आम्ही दोघी गेलो होतो. माझे निमंत्रण पत्र उशीरा आल्यामुळे रहिवासाची सोय न झाल्यामुळे मला दिल्लीला रहावे लागले. बाकी सगळ्या पुढे गेल्यानंतर चार दिवसांनी आम्ही पाचजणी मागून गेलो. त्यामुळे मला केनियाच्या महिलांमध्ये रहावे लागले. पण चायना बॉल आणि इतर प्रेक्षणीय स्थळे कारखाने, विद्यापीठ तेथील वृध्दांची निवासस्थाने इ.गोष्टी आम्ही एकत्र पाहिल्या. अगदी आठवून आठवून सगळ्यांसाठी भेटवस्तू घेतल्या. या सगळ्या प्रवासात सगळ्या मैत्रीणी फक्त मी आणि नीलम सोडून पंजाबी ड्रेस, इतर कपडे घालत असत. त्यावेळी एक मजेदार घडलेला प्रसंग दिदीने सांगितला होता.
एकदा डॉ.लोहिया आणि शैलादिदी दिल्लीला गेले असता तिने पंजाबी ड्रेस घातला होता. त्यांच्या ओळखीच्या एका माणसाने डॉक्टरांबरोबर पाठमोर्या शैला दिदीला पाहिले. त्याने ओळखलेच नाही. अरे कोण बाई आहेत आपल्या डॉक्टरांबरोबर् असे वाटून ते जवळ गेले नि दिदीला पाहून हसू लागले. बर्याच दिवसांपय्ंत हा किस्सा ती हसून हसून सांगत असे. डॉक्टर लोहिया ही खूप आनंदी, मिश्कील, थट्टेखोर स्वभावाचे होते. ते कायम शैला दिदीच्या मागे असत. कोणत्याच गोष्टीचे श्रेय स्वत: घेत नसत. ते थट्टेने म्हणत हेमाताई आपण म्हणजे वगैरे वगैरे.
अंधश्रध्दा निर्मूलन परिषदेत त्यांनी आम्हाला सांगितले होते. एकही स्त्री स्वयंपाकघराकडे फिरकणार नाही. स्वयंपाक करण्यापासून वाढण्यापर्यंत ती भांडी धुण्यापर्यंत सर्व कामे तीन दिवसाच्या परिषदेत, पुरूष बांधवानीच केले. त्यांच्या कृतीउक्तीतील एकत्वाचा म्हणूनच लोकांवर सकारात्मक परिणाम होत असे.
अशीही जीवाभावाची सखी, मेत्रीण, दिदी खरे तर बन्धू’च होती. जे भाव भावनांनी बांधलेले ते ‘बन्धू’ या अर्थाने ती आणि ते माझे बन्धूच होते.
आणि म्हणूनच ती गेल्यानंतर पहिल्या वार्षिक स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला नियोजित सन्माननीय पाहुणे न येऊ शकल्यामुळे आदले दिवशी संध्याकाळी सात वाजता जुबाचा फोन आला. मावशी आता तुलाच आईबद्दल बोलावे लागेल.आणि मी माझ्या प्रिय मैत्रिणीबद्दल माझ्या मनातील भावना व्यक्त करत मैत्रीचे भावबंध आणखी दृढ केले.
-----------------------------------------------------------------------------------------------
संवाद हाच पाया
खरंतर ते पतीपत्नी. पती पत्नीच्या नात्याला मैत्रीचं नातं देता यावं असं सर्रास घडत नाही. त्यातही दोघांचे स्वभाव म्हणजे दोन टोकं म्हणायला हरकत नाही. एकाची प्रतिमा अत्यंत शिस्तबध्द प्रसंगी फटकळ वाटावी अशी तर दुसरा मात्र आपल्या बोलण्याने कोणालाही प्रेमात पाडेल असा. आवडी निवडी वेगळ्या, शैक्षणिक पार्श्वभूमी देखील वेगळी पण एकमेकाला जपणं काय असतं आणि आपल्या सहकार्याचं जगणं अधिक चांगलं करणं काय असतं ते या जोडीकडून शिकावं. प्राचार्य डॉ.सविता शेटे आणि विजय घेवारे हे दाम्पत्य पती पत्नीच्या नात्यात वेगळेपण जपणारं जसं आहे तसंच उत्तम मैत्रीचंही एक उदाहरण आहे.
सविता शेटे आणि विजय घेवारे यांची ओळख झाली ती लग्नाच्या निमित्तानंच. दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वेगळी, स्वभाव वेगळे आणि दोघांनाही याची पुरेपूर माहिती. अशा परिस्थितीत एकत्र आलेल्या या दोघांनीही महत्वाचं केलं काय तर प्रत्येकानं दुसर्याला त्याची स्पेस दिली. प्रत्येकाच्या आवडीप्रमाणं काम करण्याची केवळ परवानगी दिली नाही तर ते काम सोपं व्हावं असं वातावरण दिलं. अनेकदा परवानगी देणं सोपं असतं तसं वातावरण निर्माण करता येईलच असं नाही. या दोघांच्या बाबतीत ते दोघांनीही जपलं. दोघांच्या स्वभावात प्रचंड भिन्नता. दोघांच्या आवडी निवडीमध्ये देखील वेगळेपण. विजय घेवारे म्हणजे मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचा माणूस, माणसात रमणारा, गोड बोलणारा आणि गोड आवडणारा देखील. याच्या उलट सविता शेटेंचं. त्यांच्या स्वभावातला करारीपणा, बाणेदारपणा यामुळं त्यांच्या जवळ जायची हिम्मत फारसं कोणी करत नाही. अत्यंत शिस्तीतलं वागणं आणि एखादी गोष्ट चुकली की समोरचा कोणीही असेल तर त्याला तुमचं चूक आहे हे ठणकावून सांगण्याचा स्वभाव. त्यामुळं एका वेगळ्या अर्थानं ज्यांना ‘आयर्न लेडी’ म्हणता येईल असं हे व्यक्तीमत्व. म्हणूनच या दोघांना एकत्र पाहणं हा अनेकांसाठी आश्चर्याचा विषय असतो. या दोघांनीही एकमेकांना प्रचंड जपलंय. सविता शेटेंच्या शब्दात सांगायचं तर ‘मला माझा स्पेस मिळावा म्हणून विजयनं अनेकदा स्वत:ला बॅकफूटला ठेवलं.’
सविता शेटे आणि विजय घेवारे यांच्या लग्नानंतर त्यांना चिन्मय झाला. आणि सविता शेटेंना मात्र नौकरीसाठी बीडला येणं भाग होतं. त्यातच चिन्मयचं आजारपण. अशा काळात सविता शेटेंची ओढाताय होवू नये यासाठी विजय घेवारेंनी जी मेहनत घेतली आणि ज्या पध्दतीनं स्वत:ला झोकून दिलं ते कधीच विसरता येण्यासारखं नव्हतं असं सविता शेटे सांगतात. तर विजय घेवारेंच्या आजारपणात ‘पोलादी’ स्वभावाच्या असणार्या सविता शेटेंचं हळवेपण सर्वांनी पाहिलंय.
दोघांना एकमेकांचे स्वभाव माहित आहेत आणि दोघांनाही एकमेकांची काळजीही तितकीच आहे. विजय घेवारेंनी काय खावं, काय खाऊ नये कुठली पथ्ये पाळलीच पाहिजेत यावर सविता शेटेंचं आजही बारीक लक्ष असतं. आणि सविता शेटेंना कामाचा व्याप आहे त्यांना जास्तीत जास्त वेळ शैक्षणिक कामासाठी देता यावा यासाठी पूरक कसं वागायचं हे विजय घेवारेंना वेगळं सांगावं लागत नाही. संघटनेचं काम हा दोघांमधला समान धागा. आणि एकत्र फिरणं ही दोघांची आवड. या एकत्र फिरण्यातूनच एकमेकांमधला संवाद हा या दोघांच्या संबंधामधलं शक्तीस्थळ म्हणा हवं तर. या दोघात कधी अबोल्याचे प्रसंग आले नाहीत असं नाही. एखाद्या विषयावरून मतभेद व्हायचे, चिडचिड व्हायची. त्यावेळी सुरूवातीच्या काळात सॉरी म्हणण्याचं काम विजय घेवारेंच असायचं आणि आता तात्पुरताच पण निर्माण झालेला अबोला तोंडाचं काम सविता शेटे करतात. काहीही झालं तरी संवाद जपायचा. आणि एकमेकांचं वेगळं अस्तित्व मान्य करून ते जपण्यासाठी परस्पर पूरक होत एकमेकांना ताकद द्यायची. एकदुसर्याची काळजी घ्यायची. या भोवतीचं पतीपत्नीचं नातं टिकलंय.
------------------------------------------------------------------------------------------------
शब्दापलिकडचं नातं
दोघंही एकाच व्यवसायातले, दोघंही महाविद्यालयीन जीवनात एकत्र, एनसीसीमध्ये दोघांनीही काम केलेलं, दोघांचाही मित्रांचा म्हणा अथवा कार्यकर्त्यांचा म्हणा पसारा मोठा, वैचारिक उंची अथवा खोली जी काही असेल ती दोघांचीही तितक्याच तोलामोलाची. पण एकजण कमालीचा शिस्तप्रिय तर दुसर्याला शिस्तीत रमलेच पाहिजे असं काही नाही. दोघांच्या राजकीय विचारधारामध्ये तर जमिन आस्मानचं अंतर पण या दोघांचही नातं मात्र खर्या अर्थाने शब्दामध्ये न मांडता येणारं. बीडच्या न्यायालयात वकीली करणारे अॅड.अजय राख आणि अॅड.भीमराव चव्हाण यांची मैत्री म्हणूनच विधी क्षेत्रात काम करणार्या सर्वांच्या दृष्टीनं आकर्षणाचं केंद्र.
1982 पासून अजय राख आणि भीमराव चव्हाण दोघं एकत्र. त्यावेळी दोघेही विद्यार्थी. अजय राख नवगण महाविद्यालयात तर भीमराव चव्हाण बंकट कॉलेजचे विद्यार्थी पण एनसीसीच्या 51 महाराष्ट्र बटालियननं या दोघांना जवळ आणलं. त्यावेळी अजय राख अंडर ऑफिसर झाले आणि तिथूनच त्यांचा आदेश इतरांसाठी महत्चाचा ठरला. भीमराव चव्हाणांच्या बाबतीत आणि आजही महत्वाचाच ठरतो. अजय राख आज जिल्हा सरकारी वकील असले तरी त्यांना पहिल्यापासून पोलिसींनची आवड आहे आणि ते पोलीस दिमागाने विचार करतात असं भीमराव चव्हाणांना वाटतं. एनसीसी नंतर दोघंही वकील झाले आणि दोघांची वकीली बीडच्याच कोर्टात. त्यावेळी खरंतर वकीलांचा एक मोठा ग्रुप बनलेला. अॅड.राम कलंत्री त्या ग्रुपचे कॅप्टन. याच ग्रुपमधून सहा दोस्तांचा एक वेगळा गटच म्हणा हवंतर तयार झाला. वकीलीच्या क्षेत्रात स्पर्धा प्रचंड असते पण प्रसंगी एकमेकांच्या समोरासमोर लढण्याची वेळ आली तरीही इथीकल प्र्रॅक्टीस कशी असते हे दोघांनीही दाखवून दिलेलं. संबंध असे की एकाच्या ज्यूनीरयरला दुसर्यानं काम सांगितलं तर तो आपल्याच साहेबाचं काम आहे असं समजून करणार. भीमराव चव्हाणांच्या आजारपणात अजय राखांनी न बोलता दिलेला मानसिक आधार भीमराव चव्हाण विसरत नाहीत. तर अजय राखांची मुलगी जणू भीमरावांनाच दत्तक दिलेली. असे हे संबंध. पण संबंधात कधी वाद होतच नाहीत असं नाही. राजकीय विचारधारा वेगळ्या असल्यामुळे अगदी क्षणाक्षणाला चेष्टा मस्करी आणि मतभेद होणारच, वादही होणारच. पण हे वाद अगदी हातातला चहाचा एक कप संपेपर्यंतचेच. त्यानंतर पुन्हा आपली मैत्री कायम जपत या जोडीचा प्रवास सुरू आहे.
------------------------------------------------------------------------------