बीड : जिल्ह्यात सध्या रमेडीसेविर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार होत असल्याचे चित्र आहे. सरकारी यंत्रणेत सध्या हे इंजेक्शन बऱ्यापैकी उपलब्ध आहे. मात्र या ठिकाणाहून देखील ज्यांना पुरवठा होतो, त्याबाबत अनेक तक्रारी आहेत. रुग्णांना दिले जाणारे डोस, इतर ठिकाणी होणार पुरवठा आणि एकंदरच या इंजेक्शनचा काळाबाजार यात जिल्हा रुग्णालयाचा औषध विभाग देखील प्रशासनाच्या रडारवर आला आहे.
या औषध विभागाचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिले आहेत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील विकास ढोले आणि महेश बाब्रस या दोन लेख परीक्षकांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीने आजच (दि.१६ ) औषध विभागाचे लेखापरीक्षण करून अहवाल द्यावा असे आदेश जिल्हाधिकारी जगताप यांनी दिले आहेत. आता या लेख परीक्षणातून काही बाहेर येते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.