Advertisement

 रुग्णांच्या साथीबाबत आरोग्य विभागातच गोधळ

प्रजापत्र | Tuesday, 13/04/2021
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच आता रुग्णांची स्थिती कशी आहे यावरून आरोग्य विभागातच गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. संचालक, आरोग्य सेवा यांच्याकडून येणारे साप्ताहिक अहवाल आणि जिल्हा स्तरावर तयार करण्यात येणारे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांचे नियमित अहवाल यात मोठ्याप्रमाणावर तफावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कॉर्न अधिक गंभीर करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना असा प्रश्न निर्माण होत आहे.

 

बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यातच कोरोनामुळे बळी जाण्याचे  प्रमाण देखील वाढले आहे. अशावेळी कोरोनाबाबतीत वस्तुस्थितीदर्शक माहिती समोर येणे आवश्यक असतानाच आरोग्य विभागाचाच याबाबतीत गोंधळ असल्याचे चित्र समोर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत प्रत्येक आठवड्याला कोविड पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करून प्रत्येक जिल्ह्याची कोरोनाबाबतची साप्ताहिक स्थिती जिल्ह्याला कळविली जाते . यात जिल्ह्यात आठवडाभरात आढळलेले  रुग्ण, बरे झालेले रुग्ण , आठवडाभरात झालेले मृत्यू आणि रुग्णांमध्ये किरि रुग्ण लक्षणे नसलेले , किती गंभीर याची माहिती असते .

 

तर दुसरीकडे मागील काही दिवसांपासून प्रशासन रोज ऑक्सिजनवर किती रुग्ण आहेत आणि त्यांना किती ऑक्सिजन लागतो याची माहिती संकलित करून त्याचे अहवाल तयार करीत आहे. मात्र आता या दोन अहवालात मोठी तफावत असल्याचे समोर येत आहे.
सोमवारी (दि. १२ ) आरोग्य विभागाचा बीड जिल्ह्याचा साप्ताहिक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यात जिल्ह्यातील ९८. ६ % रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, तर १. १ % रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत आणि केवळ ०.३ % रुग्ण गंभीर आहेत असा उल्लेख आहे. या अहवालात १० एप्रिलची जिल्ह्याची स्थिती देण्यात आली असून त्यात केवळ १९ रुग्ण आयसीयूमध्ये तर ७३ रुग्ण आयसीयूच्या बाहेर ऑक्सिजनवर असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

दुसरीकडे जिल्ह्याची रोजची ऑक्सिजनची गरज लक्षात यावी म्हणून आरोग्य विभागाने जो अहवाल तयार केला , त्यात ९ एप्रिललाच ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या चक्क ७६० इतकी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील २ व्हेंटिलेटरवर, ७० एनआयव्हीवर तर २८ हायफ्लो ऑक्सिजनवर दाखविण्यात आले आहेत . हाच आकडा १०० होतो , त्यासोबत उर्वरित रुग्ण आयसीयू बाहेर ऑक्सिजनवर दाखविण्यात आले आहेत . सक्रिय रुग्णांच्या तुलनेत ७६० रुग्ण हा आकडा सुमारे २० % इतका आहे.
जर आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शेकडा ९८ % रुग्ण लक्षणे नसलेले असतील तर ऑक्सिजनवरील रुग्णांची संख्या त्याच दिवशी ७६० कशी असू शकते ? नेमका कोणाचा अहवाल चुकीचा आहे हा प्रश्न आता उपस्थित होत आहे . हा केवळ माहितीचा गोंधळ आहे का ऑक्सिजनची अनावश्यक गरज निर्माण केली जात आहे हा देखील प्रश्न आहेच.

 

 

एनआयव्ही वरील आकडे फुगविले ?
बीड जिल्ह्यात अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार सुरु आहेत . या रुग्णालयांमधून एनआयव्ही वरील रुग्णांची माहिती रोज प्रशासनाला दिली जाते, मात्र अनेक रुग्णालयात जितके रुग्ण एनआयव्हीवर दाखविले जातात, तितकी एनआयव्ही यंत्रेच त्या रुग्णालयात नाहीत अशीही माहिती समोर येत आहे . त्यामुळे प्रशासनाने याचीही माहिती घेऊन तपासणी करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement

Advertisement