Advertisement

बीड जिल्हा बँकेवर लवकरच प्रशासक मंडळ

प्रजापत्र | Wednesday, 07/04/2021
बातमी शेअर करा

बीडः नुकतीच निवडणूक झालेल्या परंतु कोरम अभावी नविन संचालक मंडळ स्थापित होऊ न शकलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कोणत्याही क्षणी प्रशासक मंडळाची नियुक्ती होऊ शकते. जास्तीत जास्त दोन दिवसात हे आदेश येणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी बीडचे विद्यमान जिल्हाधिकारी रविंद्र जगताप आणि औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नावे चर्चेत आहेत.

 

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागील महिन्यात झालेल्या निवडणूकित १९ पैकी ११ जागा रिक्त राहिल्या असुन उर्वरित ८ पैकी ५ जागा राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास पँनल, १ जागा अपक्ष (राजकिशोर मोदी) तर प्रत्येकी १ जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि आ. सुरेश धस समर्थकांना मिळाली. मात्र कोरम पुर्ण होत नसल्याने हे संचालक मंडळ स्थापित करता येत नसल्याचे सहकार प्राधिकरणाने राज्य सरकारला कळविले होते.

 

त्यांमुळे आता बँकेवर ५ सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्याचा निर्णय सरकार पातळीवर झाला असल्याची माहिती आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदासाठी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप आणि अपर आयुक्त अविनाश पाठक यांची नावे चर्चेत असुन प्रशासक मंडळात डीडीआर, बँकींग क्षेत्रातील एक तज्ञ, आणि वकिल व सनदी लेखापाल असणार आहेत. हे आदेश येत्या ४८ तासात केव्हाही निघु शकतात अशी माहिती आहे.

Advertisement

Advertisement