Advertisement

कठोर निर्बंधांच्या नावाखाली ठाकरे सरकारने अनेक व्यवसायांना लावले कुलूप

प्रजापत्र | Monday, 05/04/2021
बातमी शेअर करा

किराणा, भाजीपाला, बेकरी, खाद्यपूरवठा, कृषीसेवा केंद्र आणि आरोग्याशी संबंधीत दुकाने वगळता इतर व्यवसाय राहणार बंद
सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक मात्र सुरु

 

 

बीड-राज्यात लॉकडाऊन नाही तर कठोर निर्बंध लावण्याची भाषा करत ठाकरे सरकारने बहुतांश व्यवसायांना कुलूप लावले आहे. किराणा, खाद्य  पुरवठा, भाजीपाला, कृषी सेवा आणि आरोग्याशी संबंधित सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय 30 तखेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने काढले. त्याचवेळी राज्यातील सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक मात्र प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन सुरु राहणार आहे. 
कोरोना संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउनच इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. यावर राज्यब्रातुन विरोध होऊ लागल्यानंतर लॉकडाऊन नव्हे तर कठोर निर्बंध अशी भूमिका रविवारी सरकारने घेतली होती. मात्र आता हे कठोर निर्बंध म्हणजे एका अर्थाने लॉकडाऊनच असल्याचे चित्र राज्य सरकारचे निर्देश समोर आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. 30 एप्रिलपर्यंत राज्यात केवळ अत्यावश्यक सुविधाच सुरु राहणार आहेत. इतर सर्व प्रकारचे व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश राज्यसरकारने काढले आहेत. त्यानूसार सर्व जिल्ह्यात ठिकठिकाणच्या जिल्हाधिकार्‍यांनी तसे आदेश काढले आहेत.

 

काय राहणार सुरु
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायं.8 या वेळेत किराणा दुकान, भाजीपाला दुकान, दुध डेअरी, बेकरी, मिठाई चे दुकान, शेती संबंधीत सेवा, रुग्णालय, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, आरोग्याशी संबंधीत सर्व सेवा सुरु राहणार आहेत. माध्यमांची कार्यालये देखील सुरु राहणार आहेत.

 

वाहतूक व्यवस्था मात्र सुरु
या काळात राज्यातील सर्व प्रकारची खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार आहेत. यात अ‍ॅटो रिक्षात चालकासह दोन प्रवाश्यांना परवानगी असेल तर चार चाकी वाहनात चालक आणि वाहनाच्या प्रवाशी क्षमतेच्या निम्म्या प्रवाश्यांना प्रवास करता येईल. बसमध्ये केवळ सीटवर बसूनच प्रवास करता येईल. 

 

कार्यालयांचे काय
बँका, महावितरण, दूरसंचारसेवा, विमा आणि मेडिक्लेम, पाणी पुरवठा ही कार्यालये वगळता इतर सर्व खाजगी कार्यालये पूर्णत: बंद राहतील. 

 

हॉटेलचे काय
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधा सुरु राहिल. शनिवार रविवार या दिवशी हॉटेलमधून परवानाधारक कर्मचार्‍यांमार्फत ग्राहकांना घरपोच सेवा देता येईल. मात्र त्यासाठी संबंधित कर्मचार्‍याकडे कोरोना चाचणीचा अहवाल असणे बंधनकारक राहणार आहे. लॉजींगची सुविधा असलेल्या हॉटेलबाबतीत रेस्टॉरंट आणि बार केवळ हॉटेलमधील प्रवाश्यांसाठीच सुरु असतील. त्या व्यतिरीक्त बार, वाईनशॉप, हॉटेल बंद राहणार आहेत.

 

आणखी काय बंद
सर्व प्रकारची धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, बागा, सार्वजनिक ठिकाणे पूर्णत: बंद राहणार आहेत. सर्व शाळा आणि महाविद्यालये देखील बंद राहणार असून खाजगी कोचिंग क्लासेसही बंद राहणार आहेत. 10 वी 12 वीच्या परिक्षा मात्र यातून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा व्यवस्थीत देता येईल. 

 

बांधकामाचे काय होणार
ज्या ठिकाणी मजूरांना बांधकामावरच राहण्याची सोय असेल अशा ठिकाणची बांधकामे सुरु राहतील. मात्र कुठल्याही परिस्थितीत बांधकामासाठी मजूरांची एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहतूक करता येणार नाही. 

 

Advertisement

Advertisement