Advertisement

धोका वाढतोय, खाटा कमी पडतायत , जबाबदारी ओळखायला हवी

प्रजापत्र | Friday, 02/04/2021
बातमी शेअर करा

बीड : बीड जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे आकडे रोज वाढतायत, अर्थात कोरोना मुक्त होणारांची  संख्याही तशीच मोठी आहे, मात्र त्या सोबतच कोरोना बळी झपाट्याने वाढत आहेत. दोन दिवसापूर्वी एकाच दिवसात ९ बळी गेले. आता तर अनेक रुग्णालयांमधून खाटा मिळणे  अवघड झाले आहे. बीडच्या जिल्हा रुगणालयत अत्यवस्थ रुग्णांसाठी बेड कमी पडत आहेत. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकानेच आता स्वतःची जबाबदारी ओळखण्याची वेळ आली आहे. सारे काही प्रशासन करील किंवा सक्तीने होईल असे नाही, तर आता 'माझे आरोग्य, माझी जबाबदारी ' अशी भूमिका घ्यावी लागणार आहे.

 

महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. बीडचंही आकडा अर्थातच मोठा आहे. रोजच तीनशेपेक्षा  अधिक व्यक्ती बाधित होत आहेत , त्यामुळेच आता कोरोनाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होणार असल्याचे चित्र आहे. सापडत असलेल्या रुग्णांमधील ९० % लक्षणे नसलेले आहेत हे मान्य , पण यांच्यापासून होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. रोज जे रुग्ण सापडतात , त्यातील सहवासितांच्या आकड्यावर नजर टाकली तर हे सहज लक्षात येऊ शकते .

 

खरा प्रश्न आहे तो गंभीर रुग्णांचा. आपल्या जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधांची सज्जता फारशी नाही, ऑक्सिजन पुरवठा पुरेसा नाही. हे आम्ही म्हणत नाही, तर हि हतबलता खुद्द जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. (सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनच्या प्रमुख कारणांमधील एक कारण वैद्यकीय व्यवस्था अपुरी असणे हे देखील आहे ) , आजच अनेक ठिकाणी रुग्णांना खाटा मिल्ने अवघड झाले आहे. बीडच्या जिल्हा रुग्णालयातील खाटा कमी पडत आहेत, अंबाजोगाईत निम्मे व्हेंटिलेटर बंद आहेत, खाजगी रुग्णालयांना आता कोठे परवानगी दिली जात आहे, मात्र त्यांच्या मर्यादा आहेत. त्यामुळे आता कोरोनापासून बचाव हेच महत्वाचे ठरणार आहे.

 

याचा अर्थ लगेच लॉकडाऊन सारखे अघोरी उपाय योजावे असे मुळीच नाही. कोरोना लगेच संपणार आहे असे नाही, त्यामुळे जगणे बंद नक्कीच करता येणार नाही, मात्र प्रशासकीय यंत्रणा अपुरी आहे याचे भान आता प्रत्येक नागरिकाने ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण गर्दीचा भाग होणे टाळलेच पाहिजे , जिथे जाणे आवश्यक आहे तिथे मास्कचा वापर केलाच पाहिजे, हे करताना मास्क पोलिसांना किंवा कोणाला दाखविण्यासाठी नाही,तर स्वतःच्या आरोग्यासाठी आहे हे पक्के लक्षात ठेवण्याची वेळ आता आली आहे. शारीरिक अंतराचे पालन, स्वच्छतेच्या नियमांचे पालन आणि गर्दीला आला घातला तर आपण कोरोना आणि लॉकडाऊन दोन्ही टाळू शकतो , फक्त प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागले पाहिजे . अगोदर स्वतःसाठी आणि त्यातून आपोआपच समाजासाठी . 
 

Advertisement

Advertisement