बीड – तालुक्यातील च नव्हे तर जिल्ह्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बीड जवळील रामगड संस्थानचे प्रमुख लक्ष्मण महाराज यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले .यामुळे भाविक भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .गेल्या काही महिन्यांपासून लक्ष्मण महाराज हे आजारी होते,या गडाच्या उभारणीत आणि गडाच्या विकासात त्यांचं खूप मोठं योगदान होतं .प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या गडावरील महाराजांचे अकाली निधन झाल्याने गड पोरका झाला आहे .
बीड तालुक्यातील श्री क्षेत्र रामगड येथील मठाधिपती ह.भ.प. महंत लक्ष्मण महाराज रामगडकर यांच्या निधनाने रामगड पोरका झाला असून, वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शोकभावना जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत.प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेले ठिकाण व थोरला गड म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र रामगडाचे महंत लक्ष्मण महाराज यांचे आज (दि. ३०) खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान देहावसान झाले.
आज संत तुकाराम महाराजांची बीज, आजच्या दिवशी लक्ष्मण महाराजांचे देहावसान होणे हा योगायोग स्मरणात राहील. महाराजांच्या जाण्याचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले आहे अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी ह.भ.प. लक्ष्मण महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.