बीड -जिल्हा प्रशासनाने दि.२६ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान बीड जिल्ह्यात कडक संचारबंदी लागू केली असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना ,गोरगरिबांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या व त्याअंतर्गत आडत, मोंढा बंद राहणार आहेत.परिणामी शेतकऱ्यांचे शेतीमाल गहू,ज्वारी, हरभरा, भाजीपाला, फळे आदींचे खरेदी-विक्री बंद झाल्यावर अतोनात नुकसान होणार असल्याने शेतीमाल खरेदी विक्रीसाठी आडत, मोंढा सुरू ठेवा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सध्या रब्बी पिकांचे काढणी, मळणी चालू आहे.नंतर शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी मशागत करायला ट्रॅक्टर,जेसीबी, दुचाकी आदी वाहने आवश्यक आहेत.मात्र प्रशासनाणे सदर वाहनांवर बंदी घातली आहे.या अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची गुरुवारी (दि.२५) भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात त्यांनी संचारबंदी काळात जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्या व त्यांअंतर्गत मोंढा,आडत दुकाने चालू ठेवून सर्व प्रकारच्या शेतीमालाचे,भाजीपाला, फळे यांचे खरेदी-विक्री चालू ठेवावेत तसेच शेती मशागतीसाठी ट्रॅक्टर,जेसीबी, दुचाकी आदी वाहनांना मुबलक प्रमाणात इंधन पुरवठा देऊन संचारबंदी काळात सवलत द्यावी व शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.