मुंबई -महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने शासन आणि प्रशासनाची चिंता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्य सरकारने देखील राज्यातील नागरिकांना या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (२२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पुढील २ दिवसांमध्ये लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. त्यानंतर आज (२३ मार्च) पुन्हा आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील प्रमुख शहरांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा दिला आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसारमाध्यमांशी साधलेल्या संवादात असे स्पष्ट केले आहे कि, “राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊन लागू शकतो.” दरम्यान यापूर्वीही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते कि, “राज्यातील कोरोना रुग्णवाढ थांबली नाही तर काही शहरांमध्ये लॉकडाऊन केला जाऊ शकतो. त्यामुळे, जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियम पाळावेच लागतील.” त्यामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकड्यामुळे राज्य सरकार काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे.