बीड : बीड शहराच्या इतिहासात २४ जुलै चा दिवस एक भयंकर दिवस म्हणूनच नोंदवला गेलेला आहे. १९८९ ला, म्हणजे ३१ वर्षांपूर्वी , २३ जुलैच्या रात्री बिंदुसरा नदीने रौद्र रूप धारण करत बीड शहरातील अनेक भागात पाणीच पाणी केले , आणि २४ ची पाहत झाली तीच मुळात दुःख, आक्रोश, हंबरडे आणि वेदनांनी . बिंदूसरेच्या महापुरात २०० पेक्षा अधिक लोक वाहून गेले, जनावरे किती गेली याची तर गणतीच नाही , चमन उद्धवस्त झाले आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या शरद पवारांना चक्क कंदील आणि पेट्रोमॅक्सच्या उजेडात अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी लागली. ३१ वर्षांपूर्वीच्या या आठवणी आजही अंगावर काटा आणणाऱ्या आहेत.
बीड शहराच्या मध्यातून जाणारी बिंदुसरा ही खरेतर बीडचे वैभव, बीडचे सौंदर्य , याच नदीने बीडच्या शिवाराचे भरणपोषण देखील केले. मात्र याच बिंदूसरेच्या रौद्र रूपाच्या आठवणी एका पिढीच्या मनातून आज ३१ वर्षांनंतरही विसरल्या जात नाहीत . १९८९ चा महापूर आणि त्याने बिघडलेला बीडचा 'नूर ' विसरू म्हणता विसरता येणार नाही.
२३ जुलै १९८९ च्या रात्री बिंदूसरेला महापूर आला, तो पालीचा तलाव भरल्यामुळे. पालीचा तलाव भरला आणि बीड शहरातून जाणारी बिंदुसरा अक्षरशः दुथडी भरून वाहू लागली नाही, तर जिथे जागा मिळेल तिथे घुसून तिने अक्षरशः तांडव केले. बीड शहरातील मोमीन पुरा, खासबाग , फुकट पुरा असे सारे भाग तिने आपल्या कवेत घेतले. बीडची त्यावेळी शान असलेले चमन तिच्या एकाच धडकेने उद्धवस्त झाले. तब्बल २०० पेक्षा अधिक लोक वाहून गेले, जनावरे आणि शेती, घरांचे नुकसान किती झाले हे तर गणतीतच नव्हते. त्याचवेळी बीडकरांनी या संकटात एकमेकांच्या मदतीला माणुसकीची साखळी उभी केली , मिळालीय सारख्या संस्था लोकांच्या निवाऱ्यासाठी समोर आल्या. जात , धर्म , पंथ याचे भेद देखील गाळून पडले आणि बीडच्या मदतीला देश धावला. त्यावेळी बीडचे जिल्हाधिकारी होते के. पी. बक्षी ,आणि मदतीची पाहणी करायला आले होते शरद पवार. वीज पुरवठा खंडित झालेला , कसलीच सोय नाही, अशा वातावरणात शरद पवारांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली ती पेट्रोमॅक्स अन कंदिलाच्या प्रकाशात . त्यांनी बीडमध्ये येऊन प्रशासन कामाला लावले. महसूलची यंत्रणा आणि नगर पालिका देखील झटली आणि काही दिवसातच बीड पुन्हा उभे राहिले. आज या घटनेला ३१ वर्ष झाली आहेत. पण पाऊस सुरु झाला आणि २३ -२४ जुलै उजाडला की बीडकर आजही जुन्या आठवणी विसरू शकत नाहीत.
प्रजापत्र | Friday, 24/07/2020
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा