कोरोनाची रुग्ण संख्या जिल्ह्यात वाढत आहे, अशावेळी सरकारी यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे. सध्या आढळत असलेल्या मोठ्या प्रमाणावर रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणेही दिसत नाहीत, त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांना गृह विलगीकरण (होम आयसोलेशन ) देण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने याचा विचार करावा असे सामान्यांचे मत आहे. दुसरीकडे राज्यभर कोरोनावरील उपचारासाठी खाजगी रुग्णालयांमधील खाटा वाढविल्या जात आहेत, बीड जिल्ह्यात मात्र मोजक्याच रुग्णालयांना कोरोनावरील उपचारासाठी परवानगी देण्यात आली आहे. रुग्णांना आपल्या जवळच्या रुग्णालयात उपचार घेण्याचा हक्क आहे. मात्र जिल्हा शल्यचिकित्सक खाजगी रुग्णालयांना परवानगी देण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. मोजक्याच रुग्णालयांना परवानगी देऊन कोरोनाच्या काळातही मोजक्याच लोकांची मक्तेदारी निर्माण केली जात आहे. जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांना परवानगी दिली तर रुग्णांना त्याचा फायदाच होईल, आणि अनेक पर्याय निर्माण होतील. मात्र आरोग्य विभागाला काही मोजक्याच दवाखान्यांची मक्तेदारी ठेवण्यात का रस आहे हे न उलगाडणारे कोडे आहे, यावर देखील जिल्हा प्रशासनाने विचार करावा आणि जी खाजगी रुग्णालये कोरोनावरील उपचारासाठी इच्छुक आहेत, त्यांना परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
बातमी शेअर करा