अंबाजोगाई दि.१० (वार्ताहर)-अलीकडच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने समोर येऊ लागले आहेत.ऑनलाईन फ्रॉड संदर्भात मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरु असतानाही अनेक विविध आमिष आणि प्रलोभनाला बळी पडत आहेत.अंबाजोगाई तालुक्यातील एका अभियंत्याला ‘एनी डेस्क’च्या माध्यमातून ५९ हजारांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला.याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रसाद रमेश शिंदे (रा. हिवरा बु., ता. माजलगाव) असे फसवणूक झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. ते अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी येथील एका बांधकाम कंपनीत कामाला आहेत. गुरुवारी (दि.४) दुपारी कामावर असताना त्यांच्या मोबाईलवर एक कॉल आला. समोरून बोलणाऱ्या भामट्याने सांगितल्यानुसार फोन पे ॲप मधील रिवार्ड जमा करत असताना प्रसाद यांच्या खात्यातून ४ हजार ९९९ रुपये त्या भामट्याच्या खात्यावर गेले. ते परत देण्याच्या बहाण्याने भामट्याने त्यांना मोबाईलवर ‘एनी डेस्क’ नावाचे रिमोट कंट्रोल ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
ॲपच्या सहाय्याने त्यांच्या मोबाईलचा ताबा घेत भामट्याने विविध व्यवहारातून प्रसाद यांच्या खात्यातून एकूण ५८ हजार ९९९ रुपये काढून घेतले. सदर प्रकार लक्षात येताच प्रसाद यांनी तातडीने उर्वरित रक्कम स्वतःच्या दुसऱ्या खात्यात जमा केली आणि बँकेला सूचित करून खाते आणि एटीएम कार्ड ब्लॉक केले. प्रसाद शिंदे यांचं फिर्यादीवरून अज्ञात भामट्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात मंगळवारी (दि.९) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रजापत्र | Wednesday, 10/03/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा