मुंबई -मनसुख हिरेन या व्यापाऱ्यांच्या हत्येच्या प्रकरणावरून राज्य सरकारला दोन दिवस सळो की पळो करून सोडणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करून सरकारची कोंडी केली .फडणवीस यांच्या रुद्रावतारामुळे सरकारने सचिन वाझे यांची बदली केली मात्र त्यांच्या अटकेची मागणी करत फडणवीस यांनी सरकारची कोंडी केली .
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल सभागृहात माझ्याविरोधात धादांत खोटी माहिती दिली. अन्वय नाईक हे प्रकरण मी दाबलं, असा उल्लेख त्यांनी केला. मी त्यांना यासंदर्भातील सुप्रीम कोर्टाचा आदेश दाखवला होता. मी पॅराग्राफ वाचून दाखवला. 306 नुसार ही केस होऊ शकत नाही, असं कोर्टाने म्हटलं. तरीही अनिल देशमुखांनी सभागृहात माझ्यावर आरोप केले. हा माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे. गृहमंत्र्यांनी खोटं बोलून माझ्या विशेष अधिकाराचं हनन केलं. त्यामुळे आपण त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘अशोक चव्हाणांनी मराठा आरक्षणाबाबत खोटी माहिती दिली’
अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाबाबत खोटी माहिती दिल्यामुळे आपण त्यांच्यावर हक्कभंग दाखल करणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अॅटर्नी जनरलांनी जी माहिती दिली नाही, ते त्यांनी सभागृहात सांगितलं. त्यामुळे हक्कभंगाचा प्रस्ताव दिला आहे. अशोक चव्हाण यांनी खोट मांडले आहे. आपला मराठा आरक्षण कायदा 102 व्या घटना दुरुस्ती नंतरचा आहे.
मुकुल रोहतगी यांनी 102 घटना दुरुस्ती चा उल्लेख केला आहे. 102 च इंटरप्रिरेशन करायचं असेल तर ते सर्व राज्यांना लागू पडेल, अशी माहिती अॅटर्नी जनरल वेणूगोपाल यांनी न्यायालयात दिली. मात्र, अशोक चव्हाण यांनी चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली. त्यामुळे आमच्या काळात झालेला कायदा निरस्त्र करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी मी अशोक चव्हाण यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.