बीड : येथून जवळ असलेल्या एका वेअर हाउसला मागील आठवड्यात आग लागली होती, यात कोट्यवधीचा कापूस जळून खाक झाला होता. मात्र कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा किंवा इतर कोणताही ज्वालाग्राही पदार्थ जवळ नसताना ही आग कशी लागली हा प्रश्न कायम असतानाच आता या प्रकरणाची दखल थेट पोलीस महासंचालकांनी घेतली आहे. केवळ बीडच्याच नव्हे तर राज्यभरातील अशा घटनांची माहिती मागविण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणाची उच्चस्तरीय किंवा सीआयडी मार्फत चौकशी होऊ शकते.
बीडपासून जवळ असलेल्या एका वेअर हाऊसला मागील आठवड्यात लागलेली आग अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहे. या आगीत कोट्यवधींचा कापूस जाळून खाक झाला होता, मात्र ही आग नेमकी कशी लागली याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. विशेष म्हणजे पोलिसांनी या आगीत राखेचे नमुने न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले असले तरी पोलिसांना अजूनही आगीच्या कर्णाबद्दल नेमके काही सांगता येत नसल्याचे चित्र आहे.
सदर वेअर हाऊसच्या परिसरात वीज पुरवठा नाही किंवा ज्वलनशील पदार्थ नाहीत त्यामुळे आग लागली कशी हा प्रश्न आहेच, त्यासोबतच कापूस पेटताना अचानक सर्व बाजूंनी कसा पेटला याचेही कोडे कायम आहे.
या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या पोलीस महासंचालकांनीच या प्रकरणाची गांभीर्याने दाखल घेतली आहे. राज्यात अशा घटना जेथे जेथे घडल्या आहेत, तेथून महासंचालकांनी माहिती मागविली आहे. जालना जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली असून त्या ठिकाणीही आगीचे कारण समोर आलेले नाही. त्यासह इतरही जिल्ह्यांकडून माहिती मागविण्यात येत असून या संपूर्ण प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बातमी शेअर करा