बीड- दि.९.(प्रतिनिधी) शहरातील बार्शी रोडवर असलेल्या एका स्टील दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील पितळी भांडे लंपास केली आहेत. या भांड्याची किंमत अंदाजे चार लाखांपर्यंत होती. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर रंगनाथ जवकर यांचे बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनासमोर साई स्टील स्क्रॅप नावाचे दुकान आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी या दुकानाचे कुलूप तोडून आज प्रवेश केला.या दुकानात पितळी भांड्याची मोड मोठ्या प्रमाणात होती. जवळपास आठ ते नऊ पोत्यांमध्ये पितळी ठेवण्यात आली होती. ही सर्व पितळी मोड चोरट्याने लंपास केली. मोड नेण्यासाठी एखाद्या चार चाकी वाहनाचा उपयोग केला असावा. असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जवकर हे दुकान उघडण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पठाण, तुषार गायकवाड शेख मोहसीन यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

