बीड- राज्यात दोन तालुका उपविभागाचे धोरण २०१३ मध्ये स्वीकारण्यात आले, मात्र बीड जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नव्हती. बीड उपविभागात तरी बीडसह गेवराई आणि शिरूर अशा ३ तालुक्यांचा समावेश होता.या पार्श्वभूमीवर आता उपविभागांची पुनर्रचना प्रस्तावित असून शिरूर आणि गेवराई तालुक्याचा स्वतंत्र उपविभाग तयार करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचे मुख्यालय बीड किंवा गेवराईला ठेवण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
राज्यात २ तालुका उपविभाग धोरण सुरू झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यांसाठी पाटोदा उपविभाग निर्माण करण्यात आला होता. मात्र याला विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्यानंतर
शिरूर तालुका बीडला जोडण्यात आला होता.आता पुन्हा एकदा उपविभाग बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शासनाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल मागितला होता.त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल दिला असून यात बीड तालुक्यासाठी बीड हा स्वतंत्र उपविभाग तर शिरूर आणि गेवराई तालुक्यासाठी एक उपविभाग प्रस्तावित करण्यात आला आहे. या उपविभागाचे मुख्यालय बीड किंवा गेवराईला करावे असेही प्रस्तावित करण्यात आले असून आयुक्तांनी हा अहवाल सचिवांकडे पाठविला आहे.