बीड-स्थानिक गुन्हे शाखेने बीडच्या पेठ बीड भागातील किराणा दुकान फोडणाऱ्या चोरट्यांचा शोध लावला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
बीड जिल्हातील नेकनूर,पाटोदा,परळी,धारूर व इतर ठिकाणी किराणा दुकान फोडून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या.या घटनेची पोलीस अधिक्षकांनी गांभीर्यानी दखल घेऊन चोरट्यांना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. पोलीस तपासात दुकान लुटणारे चौघे पेठ बीड भागातील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत समीर शेख शमशोद्दीन व अफजल खान उर्फ बाबू कासीम खान (रा.दोघे बिलालनगर इमामपूर) यांना शनिवारी (दि.२७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बार्शी नाक्यावरून अटक केली.यावेळी दोघांनी सुरुवातीला गुन्ह्याची माहिती देण्यास नकार दिला.मात्र नंतर पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून २ लाख २५ हजारांचे तेलाचे डब्बे,सुका मेवा,इतर किराणा सामान चोरीसाठी वापरलेले वाहन असा एकूण ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांना जप्त केला.दरम्यान याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक किशोर काळे हे पुढील तपास करीत आहेत.
या दुकानांना केले होते टार्गेट
बीड तालुक्यातील नेकनूरमधील १७ डिसेंबर २०२० रोजी अजहर ट्रेडिंग,३ जानेवारी २०२१ रोजी पाटोदा येथील कुस्तीपटू राहूल आवरे यांच्या वडिलांचे आर.के.मार्ट,२५ जानेवारी २०२१ रोजी धारूरमधील तिरुमाला ट्रेडिंग आणि ३० जानेवारी रोजी परळी येथील जय प्रोव्हेजन या दुकानातून तेलांचे डब्बे,सुका मेवा व इतर किराणा सामान लुटण्यात आल्याचा जबाब पोलिसांना दिला असून या गुन्ह्यातील इतर चोरट्यांचा तपास सुरु आहे.