प्रवीण पोकळे
शिक्षक म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणारा अशी परिस्थिती असतानाच्या काळात सामाजिक भान जागे ठेवून आपण ज्या वेदना अनुभविल्या, त्या वेदना इतरांना सहन करावया लागू नयेत , किंवा ज्यांना या वेदना होतात , त्यांच्या वेदनांवर आपल्या परीने कशी फुंकर घालता येईल याचा प्रयत्न करत त्या कामात स्वतःला तन , मन आणि धनाने देखील झोकून देत काम करणारा एक व्यक्ती म्हणजे भैरवनाथ भोसले. रायमोहा येथे शिक्षक असलेल्या या व्यक्तीने कोरोनाच्या आपत्तीत कोठे किराणा वाट, कोठे भाजीपाला पोहचव, कोठे गोरगरिबांना पीठ मिठासाठी रोख पैसे दे, अडचणीतल्या शेतकर्यांना बियाणे दे असे उपक्रम राबवित मदतीचा वेगळा यज्ञ उभारला आहे . सामान्यांच्या वेदनांशी नाते जोडायचे आणि समजतील संवेदना जाग्या करायच्या याच धोरणातून इच्छाशक्ती असेल तर एक व्यक्तीही खूप काही करू शकतो याचे उदाहरण भैरवनाथ भोसले यांनी घालून दिले आहे.
खरेतर कोरोना सुरु होईपर्यंत भैरवनाथ भोसले हे नाव फारसे चर्चेत कधी नव्हते. ते ज्या परिसरात आहेत, तेथे अनेक दिवसांपासून त्यांचे मदत कार्य सुरु असायचे, कोणी अडला नडला भेटला की त्याच्या अडचणीला धावून जायचे अशी त्यांची त्यांच्या मित्र परिवारात ओळख होती. पण कोरोना सुरु झाला, आणि या रोगाने सर्वांनाच जमिनीवर आणले . समाजात, आपल्या आजूबाजूला लोक कोणत्या परिस्थितीत राहात आहेत याचा विचार करायला भाग पाडले. या काळात सारे जग जणू थांबल्यासारखे झाले होते, मात्र व्यवहार थांबले तरी भूक थांबत नसते, त्यामुळे या काळात ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचा हात तोंडाची गाठ पडण्याचा संघर्ष सुरु होता. या संघर्षात अनेक संस्था लोकांच्या मदतीसाठी पुढे आल्या होत्या. अनेक व्यक्ती पुढाकार घेऊन आपल्या क्षमतेने समाजाला काही तरी देऊ करत होते. अशा काही व्यक्तींपैकीच दोन हात होते एका शिक्षकाचे.
होय, भैरवनाथ भोसले यांचे. हे हात कधी कोणत्या सुरकुत्या पडलेल्या वृद्ध आजीबाईला वाणसामान पोहचवित होते , तर कधी ज्यांना कोणताच आधार नाही, अशा व्यक्तींना रोजच्या जाण्याचे साहित्य पुरवित होते. अनेक गावात किराणा सामान पोहचवत असताना समाजापुढचे वेगवेगळे प्रश्न देखील समोर येत होते. ’बाबा, गहू, तांदूळ दिलेस , पण दळण आणायला पैसे लागतात, मीठ, मिरची, फोडणीला थोडं तरी तेल लागतंय , जळणाला लाकूड फाटा नाहीतर घासलेट आणायचं मनल तरी पैसे लागतो , अन घरात तर फुटकी कवडी नाही ’ असं कोणत्या तरी आजीबाईच्या सांगितले आणि मदतीची व्याप्ती वाढवई लागणार आहे हे लक्षात येऊन भैरवनाथ भोसले यांनी अनेक गावात रोख मदत देखील द्यायला सुरुवात केली.
तुम्ही मदत नेमकी किती केली असे विचारल्यावर ’ सर, मदतीचे आकडे कोण लिहून ठेवतोय, पण कितीतरी गावात गेलो, जिथे गरज आहे असे वाटले तिथे पोहचलो. जिथून फोन आले , निरोप आले, तिथे जाण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत अडीच तीन हजार कुटुंबांना धान्य गेलं असेल, हजार दीड हजार कुटुंबांना आर्थिक मदत करता आली, आकड्यांच सोडा, पण लोकांचे फार हाल आहेत हो, काही लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसता आले, याच समाधान आहे ’ असं जेव्हा भैरव भोसले सांगत असतात त्यावेळी खरंच माणसानं समाधान कष्ट शोधयच असत हे लक्षात येऊ शकतं.
भैरवनाथ भोसले यांनी केवळ धान्य आणि रोख रक्कमच दिली असे नाही, जिथे जशी गरज असेल तशी मदत ते करत आहेत, अख्ख्या गावाला पाणी पुरविण्याचा उपक्रम असेल , किंवा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथी निम्मित हजारो शेतकर्यांना केलेले बियाणांचे वाटप असेल, समाजाच्या गरजेला पडायचे हाच त्याच्या कार्याचा धागा आहे.
हे सर्व करणारे भैरवनाथ भोसले हे काही कोणी उद्योगपती किंवा लक्ष्मीपुत्र नाहीत. ज्या घरात अगदी रोज हातातोंडाची गाठ पडायची मारामार होती अशा आदिवासी कुटुंबात जन्मलेला हा व्यक्ती. सातवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला , पुढे लेखाधिकारी असलेल्या चुलत्यांनी शिकवले आणि शिकून डीएड झाल्यावर हा व्यक्ती जालिंदर विद्यालय रायमोहा येथे शिक्षक झाला. त्यामुळे गरिबीच्या वेदना काय असतात, शिक्षण किती महत्वाचे असते याची ओळख नव्हे तर अनुभव आलेले . याच अनुभवातून 2014 -15 मध्ये भैरवनाथ भोसले यांनी पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढले , त्यासाठी चक्क 18 लाखाचे कर्ज देखील काढले. आपण ज्या वेदना अनुभवल्या, त्या आपल्या ज्ञातीबांधवांच्या वाट्याला येऊ नयेत हीच अपेक्षा त्यामागे होती. आणि त्यानंतर समाजसेवेचे जणू काही वेड लागले. हे सारे करण्यासाठी पैसे आणता कोठून या प्रश्नावर भैरवनाथ भोसले जे काही सांगतात ते फार महत्वाचे आहे.’ पैसा लागतोच , नाही असे नाही. पैशांशिवाय काम कसे होणार? पण खिशात काही नाही म्हणून गप्प बसून कसे चालणार , इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो, मी स्वतः अनेकदा कर्ज काढतो , कधी समाजातील काही व्यक्ती पुढे येतात , पण काही तरी करायची इच्छा असेल तर अडचणी येत नाहीत. प्रसंगी आपलं सर्वस्व डावावर लावायची तयारी असली पाहिजे इतकेच ’ असं तन मन धनाने सर्वस्व झोकून देत काम करण्याची तयारी असलेले भैरवनाथ भोसले हे केवळ शिक्षक नाहीत तर खर्याअर्थाने संवेदना जाग्या असणारं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे आणि समाजाने ते जपलं पाहिजे.