बीड दि.१५(प्रतिनिधी): शहरातील चऱ्हाटा फाटा,नगर रोड परिसरातील कल्याणीनगर येथून एका महिलेचे पाच ते सहा इसम व दोन महिलांनी मारहाण करून अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली.घटनेची माहिती ११२ डायल पोलीस हेल्पलाइनवर प्राप्त होताच बीड ग्रामीण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली.सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे व त्यांच्या पथकाने अत्यंत तत्परता, प्रसंगावधान आणि नियोजनबद्ध तपासाच्या जोरावर अपहरण झालेल्या महिलेची सुखरूप सुटका केली.
सुदामती सानप (मूळ रा. मलकाचीवाडी),सध्या रा.कल्याणीनगर,चऱ्हाटा फाटा,नगर रोड,बीड या महिलेला शुक्रवार (दि.१३)रोजी तिच्या राहत्या घरातून काही अज्ञात व्यक्तींनी मारहाण करून जबरदस्तीने चारचाकी वाहनातून नेल्याची माहिती ११२ डायलवर प्राप्त झाली.ही माहिती मिळताच ११२ डायल ड्युटीवर असलेले पोलीस अंमलदार युवराज चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची खात्री केली व घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांना दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि बाळराजे दराडे यांनी तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.पोलीस हवालदार सतीश मुंडे,पोलीस हवालदार अतिश मोराळे व चालक श्री.पवार यांना सोबत घेऊन अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला.घटनास्थळाची पाहणी करून तसेच परिसरातील हॉटेल्स व रस्त्यावरील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज तपासून अपहरणकर्त्यांच्या वाहनाची दिशा निश्चित करण्यात आली.अपहरणकर्ते ज्या दिशेने गेले होते त्या मार्गावरील हॉटेल्स व इतर उपलब्ध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपहरणकर्त्यांच्या वाहनाचा माग काढत पोलिसांनी रायमोहा, तालुका शिरूर कासार व पाटोदा या दिशेने पाठलाग सुरू केला. तपासादरम्यान अपहरणकर्त्यांची नावे निष्पन्न करून त्यांच्या मूळ गावी वंजारवाडी, तालुका शिरूर कासार येथे जाऊन चौकशी करण्यात आली.गोपनीय बातमीदारामार्फत सदर महिलेला पाटोदा तालुक्यातील एका महाराजांकडे घेऊन गेल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली.मिळालेल्या माहितीच्या आधारे सपोनि बाळराजे दराडे व त्यांच्या पथकाने तात्काळ पुढील तपासाची दिशा निश्चित करून त्या ठिकाणी धाव घेतली. अथक पाठपुरावा व शोधमोहिमेनंतर अपहरण झालेली महिला व अपहरणात सहभागी असलेल्या व्यक्तींना त्यांच्या चारचाकी वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सर्वांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आले.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख,पोलीस उपअधीक्षक राजीव नवले व पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस हवालदार सतीश मुंडे,अतिश मोराळे व चालक श्री.पवार यांनी केली

