Advertisement

दिवाळीच्या तोंडावर आष्टीमध्ये बेकायदेशीर फटाका कारखान्यावर छापा; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रजापत्र | Friday, 30/10/2026
बातमी शेअर करा

आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीररित्या फटाके तयार करणाऱ्या आणि स्फोटकांचा साठा करणाऱ्या अड्ड्यांवर बीड पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. आष्टी तालुक्यातील कडा येथील नलावडे वस्तीत एका अपूर्ण बांधकामाच्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून तब्बल ९ लाख ३६ हजार ७८० रुपयांचा विनापरवाना फटाके आणि स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपअधीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कडा येथील नलावडे वस्तीतील एका चालू बांधकामावर छापा टाकला. यावेळी संशयित आरोपी शेख शफी बनेमियाँ (वय ४८, रा. बाजारतळ, कडा) हा कोणतीही अधिकृत परवानगी किंवा सुरक्षा बाळगता, केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररित्या फटाके बनवताना आणि साठवणूक करताना रंगेहात सापडला.

या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ७१ प्रकारचे विविध फटाके, मोठ्या प्रमाणात फटाके बनवण्याचे कच्चे साहित्य, कागदी पुठ्ठे आणि घातक दारूगोळा जप्त केला आहे. दाट वस्तीच्या परिसरात मानवी जीविताला आणि सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा अत्यंत निष्काळजी पद्धतीने या स्फोटकांची साठवणूक करण्यात आली होती.

याप्रकरणी आरोपी शेख शफी बनेमियाँ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२५, २८८ आणि भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम १८८४ च्या विविध कलमान्वये आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या काळात पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध फटाके निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement