वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथे समृद्धी महामार्गावर शुक्रवारी हजारो शेतकरी आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. अतिवृष्टी आणि दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाला हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळावी, या प्रमुख मागणीसाठी शिवसेना (उबाठा) गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये मोठी धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी आमदार देशमुख यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
शासनाकडून दिली जाणारी पाच हजार रुपयांची तात्पुरती मदत अपुरी असून, पिकांच्या संपूर्ण नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना थेट प्रति हेक्टरी एक लाख रुपये देण्यात यावेत, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींवरून समृद्धी महामार्ग उभारण्यात आला, त्याच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी याच मार्गावर रास्ता रोको करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला होता. या आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून आमदार देशमुख यांनी वाशीम आणि अकोला जिल्ह्यांत दौरे करून शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
शुक्रवारी सकाळपासूनच शेतकरी आणि शिवसैनिकांचा मोठा लोंढा महामार्गावर जमा होऊ लागला. पोलिसांनी रीतसर परवानगी नाकारली असतानाही जमावाने महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न केला. त्यांना हटवताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. या कारवाईवर आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध नोंदवला.
समृद्धी महामार्ग हा राज्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि वेगवान रस्ता असल्याने येथे वाहतूक कोंडी झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. या तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारत आधीच नोटिसा बजावल्या होत्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुमारे दीड हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आला होता.

