मुंबईतील जुहू परिसरात बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एक अत्यंत धक्कादायक बाब तपासातून उघडकीस आली आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या हल्लेखोरांना त्यांच्या साथीदारांकडून माध्यमांवरील बातम्यांमधून क्षणाक्षणाची अपडेट दिली जात होती. "तुमचे चेहरे बातम्यांमध्ये झळकत आहेत, इथून त्वरित पसार व्हा," असा सतर्कतेचा संदेश त्यांना देण्यात आला होता, अशी माहिती 'द इंडियन एक्स्प्रेस'ने पोलिसांच्या हवाल्याने दिली आहे.
हल्ल्याचा थरार आणि हँडलर्सची करडी नजर
१८ ऑक्टोबरच्या सायंकाळी जुहूमध्ये दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी टायगर श्रॉफच्या कारवर गोळ्या झाडल्या होत्या. या प्राणघातक हल्ल्यातून टायगर श्रॉफ सुदैवाने बचावला असला तरी, त्याचा चालक आणि सोबत असलेला एक ब्लॉगर या घटनेत जखमी झाले. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी तत्काळ घटनास्थळावरून पोबारा केला. तपासात असे उघड झाले आहे की, परदेशात किंवा इतर राज्यांत बसलेले टोळीचे सूत्रधार (हँडलर्स) टीव्हीवर सुरू असलेल्या लाईव्ह न्यूज आणि पोलिसांच्या तपासाच्या बातम्या पाहून आरोपींना पुढच्या हालचालींबद्दल सतत माहिती देत होते.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग आणि कट
या हल्ल्याचे धागेदोरे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले गेले आहेत. अमेरिकेत लपून बसलेला अनिल पंडित याने सोशल मीडियाद्वारे या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. तपासातील माहितीनुसार, रेहान अन्सारी या शूटरला अमेरिकेतील अनिल पंडित किंवा नुकतेच सोनीपतहून पकडलेले अंकित खटक आणि समीर खत्री हे मेसेजिंग ॲपच्या माध्यमातून सतत सूचना देत होते.
अत्याधुनिक ॲप्सचा वापर
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पळून जात असताना आरोपी रेहान सातत्याने मोबाईलवर व्यस्त असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांना चकवा देण्यासाठी या आरोपींनी 'सिग्नल' (Signal) आणि 'झांगी' (Zangi) यांसारख्या एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्टेड आणि अत्यंत सुरक्षित कॉलिंग ॲप्सचा वापर केला होता. इंटरनेट आणि सुरक्षित कॉलिंगमुळे पोलिसांना त्यांचे लोकेशन शोधणे सुरुवातीला कठीण जात होते.
एका फोन कॉलने उकलले गूढ
इंटरनेट कॉलिंगमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती, मात्र पळून जाण्याच्या घाईत आरोपींकडून एक मोठी चूक झाली. मुंबईतील बोरीवली येथून गुजरातच्या सुरतला जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी बुक केली होती. या टॅक्सी चालकाला संपर्क साधण्यासाठी त्यांनी इंटरनेट ॲप्सऐवजी सामान्य मोबाईल नेटवर्कवरून फोन केला.
याच साध्या कॉलचे तांत्रिक विश्लेषण करून मुंबई पोलिसांनी सुरतपर्यंत आरोपींचा माग काढला. त्यानंतर राजस्थानमधील कोटा पोलिसांशी समन्वय साधून धावत्या रेल्वेगाडीतच या आरोपींना शिताफीने बेड्या ठोकण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना ताब्यात घेतले असून १८ वर्षीय फूल सिंग, १८ वर्षीय रेहान रईसुद्दीन अन्सारी आणि २२ वर्षीय ऋतिक महतो या तीन प्रमुख शूटर्सचा यात समावेश आहे. हे तिघेही सध्या ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

