Advertisement

मराठवाड्याला दुष्काळाचा विळखा

प्रजापत्र | Friday, 23/10/2026
बातमी शेअर करा

निसर्गाचा लहरीपणा, ओला-सुका दुष्काळ आणि सततच्या नापिकीला कंटाळून मराठवाड्यातील शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचे विदारक चित्र कायम आहे. चालू वर्षात जानेवारी ते सप्टेंबर या अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत मराठवाड्यात तब्बल ७६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. प्रशासनाकडे नोंद झालेल्या या घटनांपैकी ४०३ शेतकरी कुटुंबे सरकारी मदतीसाठी पात्र ठरली आहेत, ७५ प्रकरणे अपात्र ठरवण्यात आली आहेत, तर उर्वरित २८२ प्रकरणांची अद्याप शासकीय पातळीवर चौकशी सुरू आहे.

डोक्यावर वाढणारा कर्जाचा डोंगर आणि हाती न लागणारे पीक यामुळे अल्पभूधारक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत ढकलला जात आहे. वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत ७७ तर फेब्रुवारीत ५९ आत्महत्यांची नोंद झाली होती. मात्र, त्यानंतर या आकड्यात चिंताजनक वाढ होत गेली. मार्चमध्ये ८२, एप्रिलमध्ये ७५, मे महिन्यात ८१ आणि जूनमध्ये ९० शेतकऱ्यांनी आपला जीव दिला. जुलैमध्ये हा आकडा १०५ वर पोहोचला आणि ऑगस्टमध्ये ८३ घटना घडल्या. विशेष म्हणजे, पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पावसाने दिलेली दडी आणि खरिपाच्या पिकांचे झालेले अतोनात नुकसान यामुळे एकट्या सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक १०८ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

 

जिल्हानिहाय शेतकरी-आत्महत्यांची आकडेवारी

बीड - १७०

छत्रपती संभाजीनगर - १५४

धाराशिव - १००

नांदेड - ९८

जालना - ७१

परभणी - ५६

लातूर - ५६

हिंगोली - ५५

एकूण - ७६०

Advertisement

Advertisement