Advertisement

अंबाजोगाई:नांदगावमध्ये अज्ञाताकडून सोयाबीनचा ढिगारा पेटवला

प्रजापत्र | Friday, 23/10/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव येथे एका अज्ञाताने विकृत मानसिकतेतून शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला आग लावली. गुरुवारी रात्री घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे गट क्रमांक १०१ मधील तब्बल चार एकरांतील सोयाबीनचे पीक जळून खाक झाले असून, शेतकरी लक्ष्मण शिवाजी चव्हाण यांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

सध्या बळीराजा आधीच दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत आहे. अशा कठीण परिस्थितीत दिवस-रात्र घाम गाळून पिकवलेला घास हातातोंडाशी आलेला असतानाच अज्ञाताने तो हिरावून घेतल्याने चव्हाण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण नांदगाव परिसरात मोठी संतापाची लाट उसळली असून, शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच उद्धव गाडेकर, ग्रामपंचायत अधिकारी शैलेश शिंदे, ग्राम महसूल अधिकारी शेख सलीम आणि पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाकडून जळालेल्या पिकाची पाहणी करून नुकसानीचा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी शेतकरी लक्ष्मण चव्हाण यांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात रीतसर तक्रार दाखल केली आहे. गरिबाच्या पोटावर पाय देणाऱ्या या समाजकंटकाला लवकरात लवकर गजाआड करून कठोर शिक्षा करावी, अशी जोरदार मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

Advertisement

Advertisement