Advertisement

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण

प्रजापत्र | Monday, 19/10/2026
बातमी शेअर करा

मुंबई/कोटा : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर मुंबईतील जुहू येथे रविवारी भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्याची सुपारी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगच्या तीन संशयित शूटर्सना राजस्थानच्या कोटा रेल्वे स्थानकावरून सोमवारी सकाळी नाट्यमयरित्या अटक करण्यात आली. हे तिघेही पुणे-जयपूर एक्सप्रेसने प्रवास करत होते आणि दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते.

 

मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, कोटा पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटांत संपूर्ण ट्रेनची झडती घेत या तिघांच्या मुसक्या आवळल्या. कोटाच्या पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये हृतिक (२२, रा. बेगुसराय, बिहार), रेहान (१८, रा. सोनीपत, हरियाणा) आणि एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. लॉरेन्स गँगचा गुंड 'अनिल पंडित' याने या हल्ल्याची सुपारी दिल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी टायगरच्या दिनचर्येची पूर्ण रेकी केली होती. रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास टायगर जुहूच्या पुष्पा नरसी पार्कमधून फुटबॉल खेळून बाहेर आला. तो गाडीत बसताच तिथे दबा धरून बसलेल्या दुचाकीस्वार शूटर्सनी कारवर ५ राऊंड फायरिंग केले.

 

या गोळीबारात टायगरचा ड्रायव्हर फिरदौस याच्या डाव्या हाताला गोळी लागली आणि तो गाडीबाहेर पडला. प्रसंगावधान राखत टायगर श्रॉफने स्वतः गाडीचे स्टिअरिंग हातात घेतले आणि तो वेगाने कार घेऊन सुरक्षितस्थळी रवाना झाला. हल्ला केल्यानंतर आरोपींनी आपली दुचाकी अंधेरी रेल्वे स्थानकावर सोडून पळ काढला होता.

 

या भ्याड हल्ल्यात टायगरला गोळी लागली नाही, मात्र बंदुकीची दारू आणि गाडीच्या काचा उडाल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली. नानावटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, ड्रायव्हर फिरदौस याच्या हाताच्या हाडाला फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच, या घटनेदरम्यान उमेश चव्हाण नावाचा टायगरचा एक चाहताही गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली असून, सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वांद्रे येथील सलमान खानच्या 'गॅलेक्सी अपार्टमेंट' बाहेरील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.आहे.

Advertisement

Advertisement