परळी : शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून परळीत नारीशक्तीचा जागर करणारा एक अत्यंत भक्तीमय सोहळा सोमवारी (दि. १९) संपन्न झाला. प्रभू वैद्यनाथ सेवा समितीच्या पुढाकाराने श्री वैजनाथ ज्योतिर्लिंगाजवळील ऐतिहासिक श्री वक्रेश्वर मंदिरात १२१ चिमुकल्या मुलींचे विधिवत पाद्यपूजन करण्यात आले. राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मंत्रोच्चाराच्या गजरात हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आदिशक्तीचे रूप असलेल्या या बालिकांचे पूजन करताना मंत्री पंकजा मुंडे भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या, "सध्याच्या काळात मुलींचे स्वावलंबन आणि त्यांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. समाजातील कोणत्याही मुलीवर संकट येऊ नये किंवा कोणाची वाईट नजर त्यांच्यावर पडू नये. संकटांचा खंबीरपणे सामना करण्यासाठी जगदंबेने या लेकींना अपार शक्ती द्यावी, अशी प्रार्थना मी करते." त्यांच्या या शब्दांनी उपस्थित भाविक आणि महिलांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.
कन्यापूजनाचा विधी पूर्ण झाल्यानंतर सर्व १२१ मुली वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर विराजमान झाल्या. या चिमुकल्यांनी अतिशय लयबद्ध आणि खणखणीत आवाजात ‘अयि गिरिनंदिनि नंदितमेदिनि...’ या महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सामूहिक पठण केले. त्यांच्या या सुमधुर आणि एकसुरी पठणाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला. हा अद्भुत सोहळा पाहून दर्शनासाठी आलेले भाविकही मंत्रमुग्ध होऊन तिथेच थांबले.
केवळ धार्मिक उत्सव न करता मुलींप्रती आदर वाढवणारा असा स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी प्रभू वैद्यनाथ सेवा समितीची प्रशंसा केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. अरुण पाठक, कुलभूषण जैन, योगेश मेनकुदळे, सुशील हरंगुळे, राम पेन्टेवार, वैजनाथ रेकने, योगेश पांडकर आणि बंडू कोरे यांच्यासह समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.
या मंगलमय प्रसंगी भाजप शहराध्यक्षा उमा समशेट्टी, माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, सरचिटणीस अश्विन मोगरकर आणि नगरसेविका डॉ. पूजा तोतला यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

