मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना १ सप्टेंबर २०२६ पासून ‘एनसीएमसी’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, कार्ड वितरणातील अडचणी आणि सणासुदीचे दिवस लक्षात घेता एसटी प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महत्त्वाचे दिलासे दिले आहेत. विशेषत: महिलांना १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
महामंडळाने १ सप्टेंबरपासून एनसीएमसी अनिवार्य केले. मात्र, यंत्रणा सक्षम नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, तसेच आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. ‘प्रसार माध्यमांनी' याबाबत आवाज उठवला. त्यानंतर आज महामंडळाने आपला निर्णय मागे घेत नवीन निर्णय जाहीर केले.यात, आधीच ऑनलाइन तिकीट आरक्षित केलेल्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना एनसीएमसी नसले तरी जुन्या तिकिटावर सवलतीचा प्रवास करता येईल. एनसीएमसीसाठी नोंदणी केलेल्या पण कार्ड न मिळालेल्या लाभार्थ्यांना नोंदणी पावती दाखवून ३० सप्टेंबरपर्यंत मॅन्युअल तिकीट मिळेल. सर्व्हरवर ताण आल्यामुळे येत असलेल्या अडचणी लक्षात घेता १४ सप्टेंबरपर्यंत सर्व सवलतधारकांना मॅन्युअल तिकिटावर प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.‘एसटी संगे तीर्थाटन’ या योजनेतील विशेष बसमध्ये १२ सप्टेंबरपर्यंत जुन्याच पद्धतीने सवलत लागू राहील. गणेशोत्सवासाठीच्या ग्रुप बुकिंगमधील महिला व ज्येष्ठांना एनसीएमसी सक्तीचे नसेल. मात्र, ज्या लाभार्थ्यांकडे आधीपासूनच चालू स्थितीतील एनसीएमसी आहे, त्यांना मात्र त्या कार्डद्वारेच तिकीट घ्यावे लागेल. याबाबत महामंडळाच्या महाव्यवस्थापकांकडून सर्व आगार व्यवस्थापकांना तत्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.

