Advertisement

पालकमंत्री प्रताप सरनाईकांच्या आर्थिक सहकार्यातून शाळेला पर्यायी निवारा

प्रजापत्र | Wednesday, 02/09/2026
बातमी शेअर करा

 वाशी दि.२(प्रतिनिधी): तालुक्यातील दसमेंगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या पर्यायी निवारा व्यवस्थेचे लोकार्पण मंगळवार (दि.१ ) रोजी उत्साहात पार पडले. या सुविधेसाठी लागणारी संपूर्ण आर्थिक मदत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली, त्यामुळे विद्यार्थ्यांना हक्काची व सुरक्षित सुविधा उपलब्ध झाली आहे.

   दसमेंगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच इतर उपक्रमांसाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी पर्यायी निवारा उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या कामासाठी सर्व आर्थिक मदत उपलब्ध करून दिल्याने हे काम प्रत्यक्षात साकारले. आ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद सदस्य अश्विनी सुनील उंदरे यांच्या प्रयत्नातून या सुविधेचे काम पूर्ण झाले.या पर्यायी निवारा व्यवस्थेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर झाली असून, त्यांना विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी हक्काची जागा मिळणार आहे.लोकार्पण सोहळ्यास उद्घाटक म्हणून केशव सावंत, एमडी भैरवनाथ शुगर, वाशी उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अश्विनी सुनील उंदरे, पंचायत समिती वाशीच्या सभापती प्रणिता प्रविण गायकवाड, उपसभापती नितीन शिवाजीराव रणदिवे,पंचायत समिती सदस्य अशोक भराते, गटविकास अधिकारी श्री.जाधव,गटशिक्षणाधिकारी विशाल गायकवाड,विस्तार अधिकारी सोमिनाथ घोळपे आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सहकार्याबद्दल उपस्थितांनी आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.शाळा व्यवस्थापन समिती दसमेंगाव यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement