मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. आजपासून (१ सप्टेंबर २०२६) पासून शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना एनसीएमसी (NCMC) कार्डद्वारेच सवलतीचे तिकीट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित प्रवाशांनी NCMC कार्ड प्रवास करताना सोबत ठेवण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
महामंडळाच्या परिपत्रकानुसार, विविध सामाजिक घटकांना शासन निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा देण्यात येते. या प्रवाशांसाठी NCMC कार्डची नोंदणी व वितरण करण्याचे काम महामंडळाने सुरू केले आहे. यासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लि. यांची NCMC कार्ड नोंदणी व वितरणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचे NCMC कार्ड नोंदणी व वितरणाचे काम सुरू आहे. त्यानंतर इतर सवलतधारक प्रवाशांसाठीही NCMC कार्ड नोंदणी व वितरणाची कार्यवाही करण्यात येणार आहे.एसटी महामंडळाकडून देण्यात आलेले NCMC कार्ड ६५-७५ वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना आजपासून (१ सप्टेंबर २०२६) पासून अनिवार्य करण्यात येणार आहे. या तारखेपासून ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांना शासनाच्या सवलतीचा लाभ घेताना सवलतीचे तिकीट NCMC कार्डमधूनच वितरित करण्यात येणार आहे. याशिवाय, एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या संबंधित प्रवाशांनी NCMC कार्डचे Top-up (रक्कम भरणे) करून घेणे आवश्यक आहे. याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) संबंधित आगारांना पाठविण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी १ सप्टेंबरपूर्वी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून NCMC कार्डची नोंदणी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी,तसेच कार्डमध्ये आवश्यक रक्कम Top-up करून ठेवावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.दरम्यान, अमृत ज्येष्ठ नागरिक म्हणजे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणींमुळे (हाताचे ठसे न उठणे )त्यांच्या विषयी सक्ती करण्यास काही काळ वाढवून दिला आहे. प्रवाशांनी ऐनवेळी होणारी गैरसोय टाळण्यासाठी NCMC कार्डची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.

