Advertisement

दुधभेसळीच्या ‘व्हे पावडर’ प्रकरणाला मोठे वळण; दिलीप हंबर्डे यांना अटक

प्रजापत्र | Monday, 31/08/2026
बातमी शेअर करा

 प्रविण पोकळे

आष्टी दि.३१: दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या Whey Powder (Skimmed) च्या अवैध वाहतूक व पुरवठ्याचा आष्टी पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पर्दाफाश केल्यानंतर या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले आहे. तब्बल ७२ गोण्या अर्थात अंदाजे १ हजार ८०० किलो व्हे पावडर, सुमारे २ लाख ६९ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवली आहेत. या तपासात 

   यापूर्वी सुशांत उर्फ बाबू लक्ष्मण गोपाळघरे, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर कैलास जनार्दन हंबर्डे यांना अटक करण्यात आली असून, त्यानंतर दिलीप जानदेव हंबर्डे यांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईने आष्टी शहरात एकच खळबळ उडाली आहे.आष्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हे पावडरची अवैध वाहतूक व पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर व्हे पावडर जप्त केली होती. या प्रकरणी पोलीस ठाणे आष्टी गु.र. नं. ३६९/२०२६ अन्वये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात यापूर्वी सुशांत उर्फ बाबू लक्ष्मण गोपाळघरे, रा. नागोबाचीवाडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर,कैलास जनार्दन हंबर्डे यास अटक करण्यात आली. आता दिलीप जानदेव हंबर्डे यांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आष्टी पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

 

‘मोठे नाव’ समोर आल्याने चर्चेला उधाण

या प्रकरणाच्या तपासात कारवाईनंतर आष्टीत चर्चेला उधाण आले आहे. दिलीप जानदेव हंबर्डे यांना अटक झाल्याने या प्रकरणाचा तपास आता आणखी कोणत्या व्यक्तींपर्यंत पोहोचतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

‘दुधात भेसळ’ म्हणजे थेट जनतेच्या आरोग्याशी खेळ 

दुधामध्ये भेसळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा काळाबाजार हा केवळ आर्थिक गैरव्यवहाराचा विषय नसून सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित गंभीर प्रश्न आहे. घराघरात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत दूध वापरले जाते. त्यामुळे भेसळीच्या साखळीमागे कोण असतील, याचा छडा लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पोलिस तपासाकडे तालुक्याचे लक्ष

दुधभेसळीसारख्या गंभीर प्रकारात कारवाई करताना केवळ माल जप्त करून प्रकरण थांबता कामा नये. दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे, हीच जनतेची अपेक्षा आहे.या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात, जप्त केलेल्या मुद्देमालाचा नेमका वापर कशासाठी होणार होता आणि या अवैध पुरवठ्याची व्याप्ती किती मोठी आहे, हे तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.

 

७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

दिलीप जानदेव हंबर्डे यांना ३१ ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या कालावधीत पोलिसांकडून त्यांची सखोल चौकशी केली जाणार असून, व्हे पावडरच्या अवैध वाहतूक व पुरवठ्याच्या या प्रकरणाकडे आष्टी तालुक्याचे लक्ष लागले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद भुतेकर,पोलीस ठाणे आष्टी हे करीत आहेत.

Advertisement

Advertisement