नागपूर : नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच मेयो रुग्णालय परिसरातील बालाजी कॅन्टीनमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. स्वच्छतेचा अभाव, नियमांचा पालन न करणे, आणि काही आवश्यक परवाने नसल्यामुळे ही कारवाई (FDA Action) करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत अन्न तयार करण्याचे स्वयंपाक घर आणि अन्न वाढण्याच्या जागेवर अस्वच्छता आढळली आहे. तर कॅन्टीनमधील कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था देखील योग्य नसल्याचे आढळून आले आहे. एकीकडे नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात विनापरवाना सुरू असलेल्या उपहारगृहाच्या घटनेनंतर आता 'शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय' म्हणजेच 'मेडिकल कॉलेज' परिसरामधील उपहारगृहांची ही तपासणी अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मेडिकल कॉलेज परिसरात सुरू असलेल्या चार उपहारगृहांपैकी तीन उपहारगृहाकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्याचे समोर आले आहे.दरम्यान, परवाना नसलेल्या तीन उपहार गृहांपैकी एका उपहारगृहाला त्यांच्याकडे अन्नाविषयक परवाना नसल्याने तातडीने बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर इतर दोन छोट्या उपहारगृहांना परवाना घेण्यासाठी आवश्यक अर्ज प्रक्रिया करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे नागपूरच्या मेडिकल कॉलेज परिसरात रोज रुग्ण, त्यांचे नातेवाईक, कर्मचारी आणि इतर लोक असे एकूण १५,००० नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे परिसरात विकल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे.नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) परिसरातील श्री बालाजी उपहारगृहाला अन्न सुरक्षा विभागाने कारवाईचा बडगा उगारत टाळे ठोकले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नसताना उपहार गृह सुरू असल्याचे तसेच स्वच्छतेसह अनेक त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. तर आवश्यक परवाना, कागदपत्रे आणि अहवाल सादर करून त्रुटी दूर करेपर्यंत उपहार गृह बंद ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले होते. मेयो येथे महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना चहा, नाश्ता, जेवणासह विविध खाद्यपदार्थ तयार करून विकले जात असल्याचे आढळले. मात्र अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत आवश्यक वैध परवाना उपहारगृहाकडे नव्हता. तपासणीत स्वच्छता, अन्न हाताळणीतील त्रुटी, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, पाण्याच्या तपासणीचा अहवाल नसणे तसेच कर्मचाऱ्यांना वैद्यकीत तपासण्याचे अहवाल नसल्याच्या त्रुटी आढळल्या.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नुकतीच नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली होती. यावेळी महाविद्यालयातील विविध विकासकामांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला होता.

