Advertisement

२४ वर्षांपूर्वी पंडित, आडसकरांना दूर ठेवून गोपीनाथ मुंडेंनी मिळविला होता जिल्हा बँकेवर ताबा      

प्रजापत्र | Sunday, 14/02/2021
बातमी शेअर करा

बीड-बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. निवडणूक जाहीर झाली असली आणि २० मार्च रोजी यासाठी मतदान होणार असले तरी मागचा इतिहास पाहता अनेक जागा बिनविरोधच निवडून येतील अशी शक्यता आहे. प्रश्न असेल तो वर्चस्वाचा. १९९७ ला अमरसिंह पंडित आणि बाबुराव आडसकर यांचे अर्ज उडवून काँग्रेसमधीलच लोकांना सोबत घेत गोपीनाथ मुंडे यांनी जिल्हा बँकेवर ताबा मिळविला होता, तेंव्हापासून साडेतीन वर्षाचा प्रशासकाच्या कालावधी सोडला तर ही बँक गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या ताब्यात राहिलेली आहे.

 

           

  बीड  जिल्हा मध्यवर्ती साखरी बँकेची स्थापना श्रीपतराव कदम यांनी केली, अनेकवर्ष बँकेवर श्रीपतराव कदम गटाचे वर्चस्व होते. तो काळ अर्थातच काँग्रेसचा होता. भाजपला अनेकवर्ष जिल्ह्यात फारशी संधी नव्हती. मात्र १९९५ ला गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जिल्हा बँकेत लक्ष घालण्याचे ठरविले. दरम्यानच्या काळात श्रीपतराव कदम गटाचे वर्चस्व संपुष्टात आले होते. काँग्रेस अनेक गटात विखुरली होती आणि जिल्हा बँक देखील डबघाईला आली होती. तरीही सहकारातील या बँकेचे महत्व गोपीनाथ मुंडेंना सांगितले ते राजाभाऊ मुंडेंनी, आणि गोपीनाथ  मुंडेंनी मग राजकीय डाव टाकले.
त्यावेळी जिल्ह्यात पंडित आणि आडसकर या दोन्ही गटांचा सहकारात दबदबा होता. मात्र १९९७ च्या निवडणुकीत नेमके बाबुराव आडसकर आणि अमरसिंह पंडित यांचेच अर्ज बाद झाले. यासाठी सत्तेचा वापर झाल्याचे आरोप त्यावेळी करण्यात आले होते. या दोन मात्तबरांना बँकेपासून दूर ठेवत गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमधील धैर्यशील सोळंके, राधाकृष्ण पाटील, राजेसाहेब देशमुख,रणजित पाटील आदींना सोबत घेतले आणि जिल्हा बँक ताब्यात घेतली. त्यानंतर २०११ पर्यंत जिल्हा बँकेत गोपीनाथ मुंडे म्हणतील ती पूर्व दिशा होत राहिली. २०११ मध्ये जिल्ह्यातील काही राजकीय समीकरणे बदलली, राष्ट्रवादीच्या काही संचालकांनी राजीनामे दिले आणि जिल्हा बँकेवर प्रशासक आला तो २०१५ पर्यंत. २०१५ मध्ये मात्र राज्यात भाजपची सत्ता होती, पंकजा मुंडे पालकमंत्री होत्या, त्यांनी पुन्हा अनेकांची मोट बांधली आणि जिल्हा बँक ताब्यात घेतली. आता या निवडणुकीत त्या काय करतात याकडे लक्ष असेल.

 

Advertisement

Advertisement