Advertisement

अमरावतीच्या नवजात शिशू कक्षात अग्नितांडव

प्रजापत्र | Monday, 24/08/2026
बातमी शेअर करा

 अमरावती: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला लागलेल्या आगीत (Amravati Fire news) तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता नवजात शिशू कक्षात (SNCU) व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन ही आग लागली. ही आग (Fire news) वेगाने पसरली. यानंतर रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी शिशू कक्षात असलेल्या बालकांना बाहेर काढले. ही घटना घडली तेव्हा या कक्षात ९ बालके होती. मात्र, तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुदैवी घटनेनं आज अमरावतीसह महाराष्ट्राची सकाळ वेदनादायक ठरली आहे.

   अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात सोमवारी पहाटे व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन आग लागली. ही आग वेगाने पसरत गेली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर दोन परिचारिकांच्या प्रसंगावधानामुळे या कक्षात असलेल्या सहा बाळांचा जीव वाचल्याची माहिती आता समोर येत आहे. या दोन परिचारिकांनी इवल्याशा बाळांसाठी अक्षरश: स्वत:च्या जीवाची पर्वा न करता या बाळांचा जीव वाचवला. या दोन परिचारिकांनी या सगळ्या घटनेबाबत माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की,आम्हाला समोर फक्त लहान मुलं दिसत होती. आग खूपच भीषण होती. मात्र, आम्ही आम्हाला काय होईल याचा विचार केला नाही. आम्ही या कक्षात ठेवण्यात आलेल्या पेटीतील बाळांना बाहेर काढले. आम्ही खूप प्रयत्न केले. मात्र, या कक्षात आगीमुळे सर्वत्र धूर पसरला होता. आम्हाला काहीच दिसत नव्हते. त्यामुळे तीन बाळांना वाचवता आले नाही. बाळांना वाचवताना आगीमुळे आमचे हात भाजले. या परिचारिकांनी त्यांचे भाजलेले हात बोलताना कॅमेऱ्यासमोर दाखवले.

Advertisement

Advertisement