Advertisement

गुटख्याची वाहतूक करणाऱ्या कारवर कारवाई 

प्रजापत्र | Saturday, 22/08/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२२(प्रतिनिधी): तालुक्यातील खांडेपारगाव शिवारात कारमधून गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर शुक्रवार (दि.२१) रोजी कारवाई करत गुटख्यासह इनोव्हा कार असा एकूण ८ लाख ५५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला ताब्यात घेण्यात आले तर एकजण शेतातून पसार झाला.
   पिपळनेर ते बीड रोडने पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार गुटखा घेऊन बीडकडे येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.  
दरम्यान,खांडेपारगाव शिवारातील उमरी ते खांडेपारगाव जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर संशयित कार आढळून आली.पोलिसांनी कारवर छापा टाकला असता पुढील सीटवर बसलेल्या दोन इसमांपैकी एकाने वाहन थांबताच शेताच्या दिशेने पळ काढला. तर दुसरा इसम पोलिसांच्या ताब्यात मिळून आला.पोलिसांनी एमएच १२ जी झेड १९५२ क्रमांकाच्या इनोव्हा कारची झडती घेतली असता विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. गुटखा आणि वाहन असा एकूण ८,५५,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सचिन भिमराव माटे (वय ३४),रा. भीमनगर, गेवराई, आणि रशीद सय्यद (रा. उमापूर, ता. गेवराई यांच्याविरुद्ध पिपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत,अपर पोलीस अधीक्षक समीर शेख,पोनि शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि श्रीराम खटावकर,पोह.अर्जुन यादव,गोविंद राख, पो.अं.अश्पाक सय्यद,मनोज परजणे, बबन सलगर , नितीन वडमारे यांच्या पथकाने केली.

Advertisement

Advertisement