परळी-येथील ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोंडवा सावरगाव तांड्यावर शुक्रवारी गोळीबार झाल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली होती.ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला पाठलाग करून पकडले आहे.विशेष म्हणजे गोळीबाराच्या घटनेमागे प्रेमप्रकरण कारण असल्याचे समोर आले असून परळीतील अजब प्रेमाची गजब कहाणी सध्या चर्चेत आली आहे.
एका ३२ वर्षीय तरुणाला आपल्या सख्ख्या चुलत बहिणीशी प्रेम झाले.या प्रेमाचे रूपांतर लग्नात होत नसल्याने दोघांनी ही घरातून पळ काढला.दोघे ६ वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते.मात्र काही कारणामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि मागच्या काही महिन्यांपासून प्रियसी पुन्हा आपल्या घरी आई-वडिलांजवळ राहत होती.त्यामुळे तिचा प्रियकर आणि नात्याने चुलतभाऊ असलेल्या ३२ वर्षीय तरुणाने चुलत्याच्या घरी जात लग्न करून द्या अशी मागणी लावून धरली.यातून वादविवाद झाल्यानंतर त्या तरुणाने गावठी कट्ट्यातून हवेत तीन राउंड फायर केले.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पंचनामा केला.त्यानंतर आरोपीचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या आहेत.आरोपी हा चालक असून त्याच्या या प्रतापामुळे परळी तालुक्यात अजब प्रेमाची गजब कहाणी चर्चेत आली आहे.सध्या या प्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

बातमी शेअर करा
