मुंबई : धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने पाच नवीन देवराया विकसित करण्यात येणार आहेत. प्रत्येकी पाच एकर जागेवर या देवराया साकारण्यात येणार असून, त्यासाठी नामांकित कंपन्यांच्या सीएसआर निधीतून आर्थिक सहभाग घेण्यात येणार आहे.परिवहन तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मुंबईत आज यासंदर्भात बैठक झाली.
या बैठकीस ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे अध्यक्ष तथा अभिनेते सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच टाटा मोटर्स, रिलायन्स फाउंडेशन, अशोक लेलँड, इंडियन ऑईल आणि टोयोटा या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.प्रत्येक देवराईमध्ये सुमारे २ हजार ५०० देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, लागवडीनंतर पुढील पाच वर्षे या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन केले जाणार आहे. एका देवराईच्या संवर्धनासाठी दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित असून,पाच वर्षांसाठी हा खर्च अंदाजे अडीच कोटी रुपये इतका असेल.या उपक्रमासाठी आवश्यक असलेल्या जागा निश्चित करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी आणि वन विभागाला दिले आहेत.पाच नामांकित कंपन्यांच्या सीएसआर निधीतून या देवरायांच्या निर्मिती व संवर्धनासाठी आर्थिक सहभाग घेतला जाणार आहे.धाराशिव जिल्ह्यात देशी वृक्षांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून त्यांचे दीर्घकालीन संगोपन करण्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच स्थानिक जैवविविधतेच्या संवर्धनाला चालना मिळणार आहे. दुष्काळप्रवण धाराशिवमध्ये पाच नवीन देवरायांची निर्मिती हा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.

