Advertisement

मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड

प्रजापत्र | Tuesday, 18/08/2026
बातमी शेअर करा

 छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात १७ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. श्रावण महिना लागून आठवडा उलटला असून विभागात कुठेही पाऊस नसल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर सावट निर्माण झाले आहे. गेल्या १७ दिवसांपासून विभागात पावसाचा खंड पडला असून, पिकांना गरज असतानाच पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान विभागाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांत या आठवड्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविला आहे. १ ऑगस्टनंतर दमदार पाऊस झालेला नाही.

    पावसाच्या खंडामुळे मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणीसाठ्याचा प्रश्नही गंभीर होत आहे. विभागात सोमवारी सकाळपर्यंत ०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने पिकांना काहीही दिलासा मिळालेला नाही. मराठवाड्यात ३ ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप पिकांना मोठा फायदा झाला. विशेषतः शेवटच्या टप्प्यात झालेल्या पेरणीसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. इतर विभागांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू असताना मराठवाड्यात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. आहे. आतापर्यंत सरासरी ४२६.४ मि.मी. पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३६१.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे विभागात सुमारे ६१ मि.मी. पावसाची तूट आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ३८१ मि.मी., जालना ३९५ मि.मी., बीड २७३ मि.मी., लातूर २६५ मि.मी., धाराशिव २९० मि.मी., नांदेड ४७६ मि.मी., परभणी ३४२ मि.मी. आणि हिंगोली जिल्ह्यात ४६० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर व परभणी जिल्ह्यात पावसाची सर्वाधिक तूट आहे. विभागातील सर्वच जिल्ह्यांत पुढील पंधरवड्यात पाऊस न झाल्यास पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

 

पुढील ४५ दिवस कमी पाऊस
ऑगस्टमध्ये दमदार पाऊस होण्याबाबत साशंकता आहे. तसेच सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊसही कमीच असेल. हलक्या स्वरूपाच्या सरी बरसतील. एकूण सरासरीच्या ३० टक्के पाऊस कमी होईल, असे चित्र सध्या आहे.
-श्रीनिवास औंधकर, हवामान अभ्यासक

Advertisement

Advertisement